नवी दिल्ली : राज्य घटनेत बदल करण्यासाठीच आम्ही सत्तेत आहोत, असे म्हणणारे केंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी केल्यानंतर हेगडे यांनी आपल्या वक्तव्यावरून घुमजाव केले आहे. राज्यघटनेवर माझा संपूर्ण विश्वास असून, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचे हेगडेंनी स्पष्टीकरण दिले आहे. हेगडेंच्या वक्तव्यामुळे राज्यसभेत मोठा गदारोळ झाला होता.
राज्यघटना, संसदेवर माझा विश्वास
माध्यमांशी बोलताना हेगडे म्हणाले की, माझ्या वक्तव्यावरुन संसदेत गदारोळ सुरु आहे. त्यासंदर्भात मी विश्वासाने सांगेन की, राज्यघटना आणि संसदेवर माझा सर्वतोपरी विश्वास आहे. मी कुठल्याही स्थितीत संसदेच्या विरोधात बोलू शकत नाही. कर्नाटकातील कोप्पल जिल्ह्यातील एका कार्यक्रामत हेगडे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते.
त्याचसाठी सत्तेत आलो
कर्नाटकातील कार्यक्रमात हेगडे म्हणाले होते, कुणी स्वत:ला मुस्लिम, इसाई, लिंगायत, ब्राम्हण किंवा हिंदू असे गर्वाने म्हणवून घेत असले, तर मला आनंदच होईल. जे लोक आपले मूळ विसरतात, ते स्वत:ला धर्मनिरपेक्ष म्हणवून घेतात. त्यांची स्वत:ची अशी काहीच ओळख नसते. मात्र ते विचारवंत असतात. राज्यघटनेचा सन्मान करतो. मात्र हे सारे आगामी काळात बदलेल. आम्ही त्याचसाठी सत्तेत आहोत आणि त्याचसाठी सत्तेत आलो आहोत.