इतिहासात पहिल्यांदाच भाषणावर बहिष्कार
मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाला सोमवारी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या अभिभाषणाने सुरुवात झाली. मात्र राज्यपालांचे अभिभाषण मराठीत अनुवादित न करून ऐकविले जात नसल्याने सरकारने मराठी भाषेचा अवमान केला असल्याचे सांगत विरोधकांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत राज्यपालांच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकत सभात्याग केला. राज्यपालांच्या भाषणादरम्यान सभात्याग करण्याची ही दुर्मिळ घटना असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत या चुकीसाठी माफी मागितली असून ही बाब गंभीर असल्याचे सांगत संध्याकाळपर्यंत दोषींना घरी पाठविण्याची मागणी विधानसभा अध्यक्षांकडे केली.
अभिभाषणाची सुरुवात राज्यपालांनी मराठी भाषेतच केली. सुरुवातील ४ ते ५ मिनिटे मराठीत भाषण केल्यांनतर राज्यपालांनी इंग्रजीमध्ये भाषण करण्यास सुरुवात केली. इंग्रजी भाषणाचा मराठी अनुवाद वाचण्याची सभागृहाची परंपरा आहे. मात्र अनुवाद मराठीत होत नसल्याने विरोधक आक्रमक झाले. विरोधकांनी घोषणाबाजी करूनही अनुवाद मराठीमध्ये होत नसल्याने शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी अनुवादक कक्षाकडे जात कामं सांभाळली. मात्र विरोधकांनी मराठी विरोधी सरकार असल्याचे सांगत सभात्याग केला. दरम्यान तावडे यांनी अनुवादकाची भूमिका बजावत संपूर्ण भाषण मराठीत स्वतः वाचून दाखविले.
मराठी भाषा विरोधी सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही राज्यपालांच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकून सभात्याग केला. विधानभवनातील शिवरायांच्या प्रतिमेजवळ सरकार विरोधी घोषणा देऊन सरकारचा धिक्कार करीत विरोधकांनी आंदोलन केले. यावेळी विरोधकांनी सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. राज्यपालांचे भाषण मराठीत अनुवादित न होता ते गुजरातीत होत असल्याचा आरोप विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केला.