चेन्नई- तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्याविरोधात बदनामी कारक लेख लिहिल्याप्रकरणी ज्येष्ठ पत्रकार आणि आणि एका तामिळ नियतकालिकाचे संपादक नक्किरन गोपाळ यांना अटक करण्यात आली आहे. राजभवनाकडून चेन्नई पोलिसांत दिलेल्या तक्रारीनंतर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केल्यानंतर नक्किरन गोपाळ यांची भेट घेण्यासाठी गेलेले एमडीएमके पक्षाचे नेते वायको यांनी पोलीस पत्रकारांचा आवाज दाबत असल्याचा आरोप केला आहे.
पोलिसांनी वायको यांना गोपाळ यांची भेट घेऊ दिली नाही. त्यानंतर पोलीस ठाण्याबाहेर वायको यांनी माध्यमांशी संवाद साधला. मी गोपाळ यांना भेटण्यासाठी परवानगी घेतली होती. त्यानंतरही पोलीस अधिकाऱ्यांना मला त्यांची भेट घेऊ दिली नाही. स्वतंत्र पत्रकारितेविरोधातील पोलिसांची ही कारवाई असून यातून अधिकाऱ्यांकडून होत असलेली दडपशाही दिसून येते, असा आरोप त्यांनी केला. राजभवनाच्या निर्देशावरुन ही कारवाई करण्यात आली आहे. तामिळनाडूत राज्यपाल शासन सुरु आहे, का असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, नक्किरन गोपाल यांनी निर्मला देवी सेक्स स्कँडलशी निगडीत काही लेख लिहिले होते. हे लेख प्रकाशित झाल्यानंतर राजभवनाने पोलिसांना पत्र लिहित गोपाळ यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची विनंती केली होती. त्यानंतर तामिळनाडू पोलिसांनी त्यांच्याविरोधात आयपीसी कलम १२४ अ अंतर्गत गुन्हा दाखल करत त्यांना ताब्यात घेण्यात आले.
दरम्यान, याप्रकरणी डीएमकेचे प्रमुख एम के स्टॅलिन यांनीही या अटकेचा निषेध केला आहे. भाजपा नेते एच राजा हे नेहमी प्रशोभक वक्तव्ये करत असतात. त्यांच्याविरोधात कधीच देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला नसल्याचे स्टॅलिन यांनी म्हटले.