मुंबई: महाराष्ट्रातील राजकारणात तणाव वाढलेले असताना आता शिवसेना नेते खासदार संजय राऊत आणि रामदास कदम यांनी आज सोमवारी राजभवन येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय स्थितीवर त्यांनी राज्यपालांशी विस्तृत चर्चा केली. कुणाचेही असोत पण राज्यात लवकरात लवकर सरकार स्थापन व्हावे अशी विनंती केली. सरकार स्थापनेत शिवसेनेची अडचण नाही, असे शिवसेना नेत्यांनी राज्यपालांच्या निदर्शनास आणून दिले. दरम्यान, राज्यपाल भेटीनंतर संजय राऊत ‘मातोश्री’कडे रवाना झाले असून या भेटीतील तपशील ते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना देणार आहेत.
संजय राऊत आणि रामदास कदम सुमारे तासभर राजभवनावर होते. राज्यपालांची भेट झाल्यानंतर या दोन्ही नेत्यांनी माध्यमांपुढे येत भेटीचा तपशील दिला. आम्ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावतीने राज्यपालांना भेटलो. ही आमची सदिच्छा भेट होती. या भेटीत बाळासाहेब ठाकरे यांचे ‘फटकारे’ हे पुस्तक तसेच उद्धव ठाकरे यांचे ‘पाहावा विठ्ठल’ व गडकिल्ल्यांबाबतचे पुस्तक राज्यपालांना भेट दिले, अशी माहिती राऊत यांनी दिली.