राज्यभरात रास्ता रोको

0

मुंबई । कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव आदीसह विविध मागण्यांसाठी शेतकरी सुकाणू समितीच्यावतीने राज्यात ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शेतकर्‍यांची सरकारविरोधी घोषणाबाजी करत चक्का जाम आंदोलन केले. या चक्काजाम आंदोलनात यावेळी दोन्ही ठिकाणी महामार्गावर वाहनांची मोठी कोंडी निर्माण झाली होती. विविध मागण्यांसाठी सोमवारी सकाळपासूनच शेतकरी सुकाणू समिती व विविध संघटनांनी खान्देशसह संपूर्ण राज्यात चक्काजाम आंदोलन केले. राज्य शासनाने दिलेली कर्जमाफी फसवी असून, संपूर्ण कर्जमाफी द्यावी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, ऑनलाईन अर्ज करण्याची अट रद्द करावी आदी मागण्यांसाठी मंगळवारी सकाळी 10 वाजेपासून राज्यभरात विविध महामार्गावरील प्रमुख चौकात या आंदोलनाला सुरुवात झाली़ ठिकठिकाणी शेतकर्‍यांनी रस्त्यावर उतरून चक्काजाम आंदोलन केले़ आंदोलना दरम्यान, शेतकर्‍यांनी शासन विरोधी घोषणा देवून परिसर दणाणून सोडला़

आम्ही सारे शेतकर्‍यांची पोरं
आम्ही सारे शेतकर्‍यांची पोरं असे फलक हातात घेत शेकडो विद्यार्थ्यांनी शहरातून जाणारा कोल्हार-घोटी महामार्ग रोखून धरला. शेतकरी आंदोलनाचे केंदबिंदू पुणतांबापासून नगर जिल्ह्यात चक्का जाम आंदोलन करण्यात आले. अहमदनगर, संगमनेर, अकोले, शेवगाव आदी ठिकाणी सुकाणू समिती, शेतकरी संघटना, हमाल माथाडी संघटना सहभागी होती.

शेट्टी खामगावात : बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथे मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली खामगाव येथे आंदोलन करण्यात आले. तर खामगाव हे राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांचे गृहनगर असल्यामुळे शेट्टी यांनी येथे आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. यानुसार ते आंदोलनात सहभागी झाले. तथापि, येथे बोलतांना त्यांनी झेंडा वंदनाला विरोध करण्याची भूमिका घेणार नसल्याचे स्पष्ट केले.

राज्यभरात पडसाद
सुकाणू समितीच्या वतीने करण्यात आलेल्या या आंदोलनात राज्याच्या विविध भागांमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला. खान्देशातल्या तिन्ही म्हणजेच जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात ठिकठिकाणी शेतकरी रस्त्यावर उतरले. शेतकरी संपाच्या निर्णयामुळे चर्चेत आलेल्या पुणतांब्यातही तीव्र आंदोलन करण्यात आले. याशिवाय नाशिकसह उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, पश्‍चिम महाराष्ट्र, कोकण आदी भागांमध्येही जोरदार आंदोलन करण्यात आले.