राज्यभरात वाहिले दुधाचे पाट

0

मुंबई : राज्यभरात शेतकर्‍यांनी पुकारलेल्या संपाचे पडसाद दिसून येत आहेत. संपाच्या पहिल्या दिवशी दिसून आलेले पडसाद दुसर्‍या दिवशी आणखी तीव्र होते. राज्यभरात ठिकठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने संपाला पाठींबा दर्शवण्यात आला. कोणी कांदे-बटाचे रस्त्यावर फेकले तर कोणी भाजीपाला, फळे रस्त्यावर फेकली. धक्कादायक म्हणजे या दोन दिवसांत राज्यभरात दूधाचे पाटचे पाट वाहिल. परिणामी यापुढे राज्यभरात याचे पडसाद उमटणार आहेत. भाज्यांचे आवक कमी होणार तर भाव वाढीला नागरिकांना सामोरे जावे लागणार आहे.

सोलापूर दूध ओतून आंदोलन
राज्यभरात संप सुरू असताना पुणे राष्ट्रीय महामार्गावर मोहोळ जवळ आंदोलकांनी उड्डाण पुलावरून दूध खाली ओतून आंदोलन केले. त्यामुळे सोलापूरात रस्ते दुधमय झालेले दिसले. मात्र यामुळे सोलापूरात भविष्यात दूधाचा मोठ्या प्रमाणात तुटवडा भासणार आहे. परिणामी दुधाचे भावही कडाडणार आहेत.

पुण्यात 80 रुपये लिटरने दूध विक्री
पुणे : राज्यातील शेतकर्‍यांनी पुकारलेल्या संपामुळे पुणे शहरात दुधाचा तुटवडा निर्माण झाला आहे. गुरुवारी शेतकर्‍यांच्या दिवसभराच्या आंदोलनामुळे शहरात दुधाची आवकच झाली नाही, त्यामुळे दूधविक्रेत्यांनी या संधीचा फायदा घेत दुधाचे दर वाढवले आहेत. पुण्यात 56 रुपये लिटर असलेले म्हशीचे दूध 80 रुपये प्रतिलिटरने विकले जात आहे. तर 40 रुपये लिटरने मिळणार्‍या गायीच्या दुधाची 60 रुपये प्रतिलिटर दराने विक्री केली जात आहे. दुधाचे दर जरी वाढले असले तरी दूध खरेदीसाठी पुणेकरांनी मात्र दुकानांबाहेर लांब रांगा लावल्या आहेत.

मुंबईत कमी दूध संकलन
पुणे शहरात तर गुरुवारपासूनच (1 जून) दुधाचा तुटवडा जाणवायला लागला आहे. शेतकर्‍यांच्या आंदोलनामुळे दुधाची आवकच झाली नाही. त्यामुळे दूधविक्रेत्यांनी या संधीचा फायदा घेत दर वाढवले आहेत. पुण्यात 56 रु. लीटर असलेलं म्हशीचं दूध 80 रु. प्रतिलीटरनं विकलं जातं आहे. तर गायीचं 40 रु. लीटरचं दूध 60 रुपये प्रतिलीटर दराने विकलं जातं आहे. दुधाचे दर जरी वाढले असले तरी दूध खरेदीसाठी पुणेकरांनी मात्र दुकानांबाहेर लांब रांगा लावल्याचं चित्र पाहायला मिळालं. तर शेतकरी संपावर असल्याने मुंबईतील दूध संकलन कमी झालं आहे. त्यामुळे मुंबई आणि परिसरात उद्यापासून दुधाची टंचाई होऊ शकते. त्यासाठी गुजरातहून मोठ्या प्रमाणवर दुधाची आवक होणार आहे.

ठाण्यात दुधाची आवक घटली
तर ठाण्यात दुधाच्या पुरवठ्यावर आज फारसा परिणाम झालेला दिसत नाही. ठाणे जिल्ह्यात दररोज 2.50 लाख लिटर दुधाची आवक होते. मात्र आज ही आवक 2.10 लाख लिटरच झाली आहे. ठाण्यात पश्‍चिम महाराष्ट्र, नाशिक, जळगाववरुन काही प्रमाणात दुधाची आवक काही प्रमाणात झाली आहे, तर गुजरातमधूनही अमूल दूधाची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. शहरात पोलिस बंदोबस्तात दुधाच्या गाड्या दाखल होत आहेत. दरम्यान शुक्रवारी संप कायम राहिल्यास शनिवारी दुधाची टंचाई भासण्याची शक्यता आहे.

नाशिक दूध खरेदीसाठी झुंबड
नाशिकमधून गुजरातला जाणारा टँकर रोखण्यात आला. सिद्ध पिंप्री गावात शेतकर्‍यांनी दूध रस्त्यावर सोडून निषेध व्यक्त केला. एकीकडे दूध रस्त्यावर फेकले जाते आहे, तर नाशिकमध्ये दूध आल्यानंतर नागरिकांची खरेदीसाठी झुंबड उडताना पाहायला मिळत आहे. लवकर पोहोचले नाही तर दूधही मिळत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अजून काही दिवस शेतकर्‍यांचा संप सुरु राहिला तर परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे

नगरमधील संकलन ठप्प
अहमदनगरला शेतकर्‍यांचा संपाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यातील एका दिवसाचं 20 लाख दूध संकलन सलग दुसर्‍या दिवशी बंद असल्याने पुणे, मुंबई आणि ठाण्याचा दूध पुरवठा ठप्प आहे.

येवल्यातील आंदोलनात एकाचा मृत्यू
शेतकर्‍यांच्या संपामध्ये गुरुवारी एका शेतकर्‍याचा जीव गेला आहे. येवला तालुक्यातील पिंपळगाव जलाल टोल नाक्यावरील किसान क्रांती मोर्चात सहभागी असलेल्या अशोक मोरे यांचे हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. पिंपळगाव जलाल टोलनाक्यावर आंदोलन सुरू असताना पोलीस आणि शेतकर्‍यामध्ये झटापट झाली. यावेळी लाठीचार्ज सुरु झाला. त्यानंतर मोरे हे पळत असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांचे उपचारापूर्वीच निधन झाले. त्याचबरोबर आंदोलकांना प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी हवेत केलेल्या गोळीबारात एक जखमी झाला आहे, तर दगडफेकीत चार ते पाच पोलीस जखमी झाले आहेत. सध्या या परिसरात मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

कर्जबाजारी शेतकर्‍याची आत्महत्या
एकीकडे संप सुरू असताना दुसरीकडे मंडणगड तालुक्यातील वेरळतर्फे नातूनगर या गावातील 58 वर्षीय शेतकर्‍याने बँकेचे कर्ज फेडता न आल्याने आपल्या राहत्या घराच्या छपराला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अशा प्रकारची तालुक्यातीलच नव्हे तर कोकणातील ही बहुदा पहिलीच घटना आहे. यामुळे खळबळ माजली आहे. बुद्धदास लक्ष्मण साळवी असे आत्महत्त्या केलेल्या शेतकऱयाचे नाव आहे. आत्महत्त्या केलेल्या शेतकर्‍याचा मुलगा भीमराज साळवी यांनी येथील पोलीस स्थानकात खबर दिली. बुद्धदास साळवी यांनी तालुक्यातील बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीयकृत बँकेकडून 1 लाख रूपयांचे पीक कर्ज घेतले होते. मात्र या कर्जाचे हप्ते त्यांना वेळच्या वेळी भरता येत नव्हते. यामुळे बँकेकडून कर्ज हप्ते वसुलीचा तगादा लागला होता. तसेच बुधवारी बँकेची नोटीसही त्यांना देण्यात आली होती व हप्ते भरण्याचे फोनही येत होते. यामुळे ते गेले काही दिवस अस्वस्थ होते. याच कारणाने त्यांनी गुरूवारी मध्यरात्री 2 ते पहाटे 6 वाजण्याच्या दरम्यानच्या कालावधीत आपल्या राहत्या घरी छताला गळफास लावून त्यांनी आत्महत्या केली. साळवी यांच्या मृतदेहाचे विच्छेदन दापोली उपजिल्हा रूग्णालयात करण्यात आले.