राज्यमंत्रीपद बिनअधिकाराचे

0

पुणे : गेल्या काही दिवसांपासून खासदार राजू शेट्टी व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यातील वाद वाढतच चालला आहे. खासदार राजू शेट्टी यांनी पुन्हा एकदा सदाभाऊ खोत यांच्या अधिकारांवर प्रश्‍नचिन्ह उभे करत, मी सुद्धा आमदार होतो, त्यामुळे राज्यमंत्र्यांना काय अधिकार असतात हे मला चांगलेच ठाऊक असल्याचे त्यांनी सांगितले. शेट्टी येत्या 22 मेपासून आत्मक्लेश पदयात्रा काढणार आहेत. त्यासंबधीं पुण्यात पत्रकार परिषद घेण्यात आली होती. यावेळी बोलताना शेट्टी यांनी खोतांवर शाब्दिक फटकेबाजी केली.

…त्यांच्या मंत्रिपदाचा उपयोग नाही
सरकारमध्ये सहभागी असल्याबाबत विचारणा केली असता शेट्टी म्हणाले की, आमचा सत्तेतील सहभाग अतिशय सूक्ष्म आहे. त्यामुळे सत्तेत असल्याने काही फरक पडणार नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खोत हे जरी राज्यमंत्री असले तरी देखील आमदारांच्या प्रश्‍नांना उत्तर देण्याशिवाय दुसरे काही काम राज्यमंत्र्याना नसते. महत्त्वाच्या कॅबिनेट बैठकीलासुद्धा राज्यमंत्र्यांना बसता येत नसल्याचे सांगत शेट्टी यांनी खोत यांच्या मंत्रिपदाचा कोणताही उपयोग नसल्याचे स्पष्ट केले.

आत्महत्यांसाठी शेतकरी नेते जबाबदार
समाज, व्यवस्था, राजकारणी यांच्यावर अविश्‍वास दाखवत शेतकरी आत्महत्या करत असतात. राज्यातील तसेच देशातील शेतकर्‍यांच्या आत्महत्या शेतकरी नेत्यांना थांबवता आल्या नाहीत. त्यामुळे शेतकर्‍यांच्या आत्महत्येसाठी शेतकरी नेतेही जबाबदार आहेत, असे शेट्टी म्हणाले. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याचाही निषेध करण्यात आला.