राज्यमंत्री अकबर यांचा प्रिया रमाणी विरोधात मानहानीचा दावा

0

नवी दिल्ली : परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप करणाऱ्या पत्रकार प्रिया रमाणी यांच्याविरोधात अकबर यांनी पतियाळा कोर्टात मानहानीचा दावा दाखल केला आहे. अकबर यांनी वकील करंजवाला अँड कंपनी यांच्या मार्फत हा खटला दाखल केला आहे.

ज्येष्ठ पत्रकार आणि परराष्ट्र राज्य मंत्री एम. जे. अकबर यांच्यावर काही पत्रकार महिलांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. एम. जे. अकबर ‘टेलिग्राफ’चे संपादक असताना नोकरी देण्यासाठी घेतलेल्या मुलाखतीवळी अकबर यांनी कसा लैंगिक छळ केला याची माहिती सर्वप्रथम प्रिया रमाणी यांनी दिली होती. रमाणी यांच्या आरोपांनंतर अकबर यांच्याविरोधात टिकेचे वादळ उठले. यानंतर आणखी काही महिला पत्रकारांनी अकबर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या आरोपांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून अकबर यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.

रविवारी अकबर हे परदेश दौऱ्यावरुन भारतात परतल्यानंतर त्यांनी आरोपांवर स्पष्टीकरण दिले होते. आपल्यावरील आरोप असंस्कृत आणि बिनबुडाचे असून लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच मी टू वादळ का सुरू झाले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. ‘माझ्यावरील लैंगिक गैरवर्तनाचे आरोप बनावट आहेत. अशा आरोपांमुळे माझ्या प्रतिष्ठेचे भरून न येणारे नुकसान झाले आहे. माझे वकील या तथ्यहीन आरोपांबाबत कायदेशीर पावले उचलतील’, असा इशाराही अकबर यांनी दिला होता. यानुसार अकबर यांनी सोमवारी रमाणी यांच्याविरोधात पतियाळा कोर्टात मानहानीचा खटला दाखल केला आहे.