राज्यमंत्री शिवतारे हेल्मेट सक्तीचे समर्थक!

0

पुणे : हेल्मेटची किंमत क्षुल्लक आहे. पण वापरण्यामागील हेतू उदात्त आहे. आजही महाराष्ट्रातील अनेक शहरात हेल्मेटसक्ती आहे आणि ते त्याचे पालनही करतात. त्यामुळे हेल्मेट सक्तीमागील हेतू चांगला असेल तर कोणीही विरोध करू नये, असे सांगत शिवसेनेचे आमदार आणि राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी पुण्यातील हेल्मेट सक्तीला पाठिंबा दर्शवला आहे.

हेल्मेटसक्तीचा निर्णय हा सुप्रीम कोर्टाचा आहे आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करण्याचा अधिकार कुणालाच नाही. रोज होणार्‍या अपघातात अनेकांचे जीव जातात. त्यामुळे जनतेच्या काळजीपोटीच हेल्मेट सक्ती केल्याचे सांगत हेल्मेट सक्तीला पाठिंबा दर्शवला.

पुण्यातील विविध राजकीय पक्षांनी या कारवाईचा विरोध केला आहे. हेल्मेट विरोधी कृती समितीने तर पुणे जिल्ह्यातील आमदार-खासदारांचे मोबाईल क्रमांक सार्वजनिक करून नागरिकांनी फोन करून हेल्मेट सक्ती रद्द करण्यास सांगावे असे आवाहन केले होते. परंतु पुणे जिल्ह्यातील पुरंदरचे शिवसेनेचे आमदार विजय शिवतारे यांनी मात्र हेल्मेट सक्तीला पाठिंबा दर्शवला.