मुंबई : कृषी पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना सातारा जिल्ह्याचे सहपालकमंत्रीपद दिल्यानंतर आता त्यांच्याकडे आणखी महत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याकडे स्वच्छता आणि पाणीपुरवठा खात्याच्या राज्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्याची घोषणाच शिराळा येथिल शेतकरी मेळाव्यात मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या मेहरबानीने पहिलवान सदाभाऊ खोत राजकिय आखाडा गाजवणार आहे.
पुन्हा ठरले नशिबवान
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांना विधानपरिषदेवर निवडून आणत त्यांच्याकडे कृषी पणन राज्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यानंतर आता सदाभाऊ खोत पुन्हा एकदा नशिबवान ठरले आहेत. सहपालकमंत्रीपदाचा कारभारहाती घेण्याअगोदरच मुख्यमंत्र्यांनी खोत यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी नववर्षाच्या पुर्वसंध्येला शिराळ्यातील शेतकरी मेळाव्यात सदाभाऊ खोत यांच्याकडे स्वच्छता आणि पाणीपुरवठा खात्याच्या राज्यमंत्रीपदाची जबाबदारी देत असल्याची घोषणा केली. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेमुळे स्वाभिमानीच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांना सुखद धक्का मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.
स्वाभिमानीत दोन सत्ताकेंद्रे निर्माण करण्याची खेळी
राज्यमंत्री खोत यांनी मिळालेल्या संधीचे सोने करत अल्पावधीतच राजकीय वर्तुळात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. शेतकर्यांचे, सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी धडपडणार्या खोत यांच्याकडे सगळ्यांच्याच नजरा लागल्या आहेत. त्यांच्या कार्यक्षमतेची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वच्छता आणि पाणीपुरवठा या दोन खात्याचा भार देताना राजकीय गणीत साधले आहे. याचसोबत आगामी काळात स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये दोन सत्ताकेंदे निर्माण करण्याच्याच खेळीचा हा भाग असल्याचे राजकीय क्षेत्रातील जाणकार बोलत आहेत.