सोयगाव । सोयगाव-बनोटी-नागद राज्यमार्गाला जोडलेल्या रस्त्याची चाळणी झालेली आहे. या रस्त्याच्या दुरुस्ती करावी तसेच या रस्त्याकडे लक्ष देण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्या पुष्पा काळे यांनी केली आहे. मागणीचे निवेदन त्यांनी केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांना निवेदनाद्वारे कळविले आहे. सोयगाव ते चाळीसगाव या राज्यमार्गाला जोडलेल्या सोयगाव-बनोटी-नागद या रस्त्याची गेल्या पंचवीस दुर्दशा झालेली असल्याने बनोटी गोंदेगाव भागातील नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी प्रवास करतांना हाल सहन करावा लागतो. अद्यापही या रस्त्याची दुरुस्ती तर दूरच पण साधी डागडुजी झालेली नसल्याने रस्ते विकास निधीतून या रस्त्याची नव्याने बांधणी करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य पुष्पा काळे यांनी निवेदानाद्वारे केली आहे. निवेदनावर कैलास काळे, जयप्रकाश चव्हाण, मंगेश सोहनी, सुनील ठोंबरे, शांताराम देसाई आदींच्या स्वाक्षर्या आहे. या प्रकरणी केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांनी या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी लक्ष घालण्याचे आश्वासन दिल्याने या रस्त्याच्या नव्याने निर्मितीला मुहूर्त मिळाल्याची चर्चा तालुक्यात सुरु आहे.