राज्यसभा निवडणुकीची लढाई दिल्लीत पोहोचली!

0

गांधीनगर/नवी दिल्ली : गुजरातमधील राज्यसभेच्या तीन जागांसाठी मंगळवारी मतदान झाले. सर्व 176 आमदारांनी मतदान केले. काँग्रेसच्या सात आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याचे उघड झाल्याने काँग्रेसचे चाणक्य तथा काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांच्यावर पराभवाचे सावट पसरले होते. दोन काँग्रेस बंडखोरांनी केलेले मतदान भाजप अध्यक्ष अमित शहांना जाहीरपणे दाखविल्यामुळे नियमभंग झाल्याचा मुद्दा उपस्थित करत, काँग्रेसने हे मतदान रद्द करण्याची मागणी केली. त्यावर भाजपनेही काँग्रेसच्या मागणीला विरोध केला. दोन्हीही पक्षांनी नवी दिल्लीत निवडणूक आयोगाकडे धाव घेतल्याने मतमोजणीची प्रक्रिया ठप्प पडली होती. काँग्रेसचे आरोप निराधार असून, मतदानादरम्यान ते शांत बसले अन् आता पराभव दिसू लागताच निराधार आरोप करत आहेत, अशी टीका भाजप नेत्यांनी केली. भाजपतर्फे केंद्रीय मंत्री अरुण जेटली, रवीशंकर प्रसाद, मुख्तार अब्बास नक्वी, निर्मला सीतारामन, पीयूष गोयल यांनी आयोगाकडे धाव घेऊन तळ ठोकला होता. तर काँग्रेसतर्फेही माजी केंद्रीयमंत्री पी. चिदंबरम्, मुकुल वासनिक, पक्षप्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांच्यासह वरिष्ठ नेत्यांनी आयोगाकडे धाव घेऊन नियमभंग झाल्याचा मुद्दा रेटला. हरियाणामध्ये असाच प्रकार झाल्यानंतर तेथे मत रद्द झाले होते, तोच नियम गुजरातमध्ये लावला जावा, अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान, आपल्याला कोणतेही शिष्टमंडळ भेटले नाही, अशी चपराक आयोगाने लावली होती.

दोन्ही पक्ष एकमेकांविरुद्ध उभे ठाकले
काँग्रेसचे दोन बंडखोर उमेदवार राघव जी. पटेल व बोहराभाई पटेल यांनी मतदानानंतर आपले मतपत्र तेथील काँग्रेसचे पोलिंग एजंट यांना दाखविण्याऐवजी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना दाखवले, असा काँग्रेसचे पक्षप्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांना आरोप केल्यानंतर काँग्रेस आक्रमक झाली. हा सरळ सरळ नियमभंग असून, पक्षाच्या आमदारांनी पक्षादेश झुगारल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या आमदारांचे मत रद्द करण्यात यावे, अशी मागणी सुरजेवाला यांनी निवडणूक आयोगाकडे पत्राद्वारे केली. काँग्रेसचे वरिष्ठ नेते पी. चिदंबरम् यांनीही आयोगाची भेट घेऊन, हरियाणामध्येही असाच प्रकार घडला असता, तेथे मत रद्द करण्यात आले होते. तसेच, गुजरातमध्ये नियमभंग झाल्याचा आमच्याकडे व्हिडिओ पुरावा असून, भाजप सत्तेचा दुरुपयोग करत असल्याचा आरोपही चिदंबरम् यांनी केला. काँग्रेसच्या या आरोपानंतर निवडणूक आयोगाने तातडीने मतमोजणी थांबवली व घटनास्थळाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग दिल्ली मुख्यालयात मागून घेतले होते. गुजरातचे काँग्रेस नेते अर्जुन मोढवाडिया यांनीही भाजपवर निवडणूक आयोगावर दबाव टाकण्याचा आरोप केला. काँग्रेस, भाजप आणि निवडणूक आयोगाचे अधिकारी यांनी एकत्रित हा व्हिडिओ पहावा, अशी मागणीही मोढवाडिया यांनी केली.

काँग्रेसचे आरोप निराधार : भाजप
दरम्यान, केंद्रीय कायदेमंत्री रवीशंकर प्रसाद यांनी निवडणूक आयोगाची भेट घेऊन भाजपची बाजू मांडली. राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभवाची जाणिव झाली आहे. परंतु, हा पराभव ते पचवू शकत नाहीत. त्यामुळे नानाविध प्रकारे ते आपली निराशा झाकण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचे आरोप पूर्णपणे निराधार आहेत. काँग्रेसचे उमेदवार मतपत्रिका दाखवितानाचा कोणताही व्हिडिओ नाही, असेही प्रसाद यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. काँग्रेसच्यावतीने राज्यसभेचे खासदार आनंद शर्मा, माजी मंत्री पी. चिदंबरम्, प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनीही आयोगाकडे जोरदार युक्तिवाद केला. भाजपनेही केंद्रीय मंत्री अरुण जेटली, पीयूष गोयल, रवीशंकर प्रसाद, धर्मेंद्र प्रधान, निर्मला सीतारामण यांच्यासह केंद्रीय मंत्र्यांची फौजच आयोगाकडे पाठवली होती. रात्री उशीरापर्यंत दोन्ही बाजूने जोरदार युक्तिवाद सुरु होता. आयोगाने नियमानुसार काम करावे, कायद्याची चौकट ओलांडू नये. राज्यसभेचा नियम स्पष्ट आहे, की आमदार दुसर्‍याला मत दाखवत असेल तर ते अवैध ठरते. हरियाणामध्ये चुकून असा प्रकार घडला होता. तेथे मत रद्द झाले होते, असे खा. आनंद शर्मा यांनी सांगितले. तर काँग्रेस मतदानादरम्यान चूप का बसली? आपण सहा तास काय करत होता? सहा तासानंतर कशी काय जाग आली? काँग्रेसचे आरोप निराधार असून, एकवेळ मत टाकल्यानंतर नंतर काहीही करता येत नाही. त्यामुळे काँग्रेसचा अर्ज रद्द करा, अशी मागणी रवीशंकर प्रसाद यांनी केली.

मतदानानंतर त्वरित क्रॉस व्होटिंगची तक्रार केली होती. परंतु, अधिकार्‍यांनी लक्ष दिले नाही. आपण पूर्णपणे निश्चित असून, आपल्याला विजयाइतकी मते मिळाली आहेत.
– अहमद पटेल, काँग्रेस नेते

पटेल यांना 45 मते?
गुजरात विधानसभेत 182 सदस्य आहेत. सहा काँग्रेस आमदारांच्या राजीनाम्यानंतर विधानसभेत 176 सदस्य उरलेत. त्यात भाजप 121 आणि काँग्रेसचे 51 सदस्य आहेत. विजयासाठी अमित शहा, स्मृती इराणी, आणि अहमद पटेल यांना प्रत्येकी 45 मतांची गरज आहे. भाजपने काँग्रेस बंडखोर बलवंतसिंह राजपूत यांना उभे केल्याने पटेल यांची मते विभाजित झाली आहेत. काँग्रेसची दोन मते फुटल्याचे स्पष्ट झाले असून, राष्ट्रवादीचे एक मत भाजप अन् दुसरे मत काँग्रेसला पडले आहे. तर जनता दल (संयुक्त)च्या आमदाराच्या मतावरून संभ्रम निर्माण झाला होता. म्हणजेच, पटेल यांच्या बाजूने 43 काँग्रेस, एक राष्ट्रवादी असे 44 मते पडल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. जदयुचे मत त्यांना मिळाल्यास ते निवडून येऊ शकतात.