राज्यसभा निवडणुकीसाठी रस्सीखेच सुरू

0

मुंबई । आता राज्यसभा निवडणुकीचा बिगुल वाजू लागला आहे. एप्रिल महिन्यात रिक्त होणार्‍या राज्यसभेच्या 58 जागांपैकी महाराष्ट्रातील सहा जागांचा समावेश आहे. यातील काँग्रेस व राष्ट्रवादीच्या प्रत्येकी दोन जागांचा समावेश आहे तर शिवसेना-भाजपच्या एका-एका जागेचा समावेश आहे. मात्र, सध्या विधानसभेतील संख्येनुसार भाजपला तीन तर काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी एक-एक मिळू शकते. शिवसेनेकडून अनिल देसाई यांना उद्धव ठाकरेंनी संधी दिली आहे तर राष्ट्रवादीकडून वंदना चव्हाण यांना डबल टर्म मिळणार हे जवळपास निश्‍चित आहे.

भाजप काँग्रेसमध्ये इच्छुकांची गर्दी
काँग्रेसच्या एका जागेसाठी चार-पाच जण इच्छुक आहेत तर भाजपमधूनही तीन जागांसाठी अनेक जण इच्छुक आहेत.महाराष्ट्रातून रिक्त होत असलेल्या सदस्यांमध्ये रजनी पाटील (काँग्रेस), राजीव शुक्ला (काँग्रेस) वंदना चव्हाण (राष्ट्रवादी) डी पी त्रिपाठी (राष्ट्रवादी), अनिल देसाई ( शिवसेना) आणि अजय संचेती (भाजप) आदींचा समावेश आहे.शिवसेनेकडे 63 आमदार आहेत. एक जागा जिंकण्यासाठी 42 मते आवश्यक आहेत. त्यासाठी अनिल देसाईंना पुन्हा संधी दिली आहे.त्यामुळे शिवसेनेची एक जागा जिंकून किमान 20 मते शिल्लक राहतात.