नवी दिल्ली-राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी ९ ऑगस्टला मतदान होणार आहे. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी यासंदर्भातली घोषणा केली. यासाठी ८ ऑगस्टच्या दुपारपर्यंत नामांकन दाखल करता येणार आहे. एनडीएने राज्यसभेचे खासदार हरवंश यांना उमेदवारी देण्याचे ठरवल्याची चर्चा आहे. हरवंश हे दैनिक प्रभात खबर या वृत्तपत्राचे संपादक आहेत.
विरोधी पक्षाने अद्याप कोणत्याही उमेदवाराचे नाव घोषित केलेले नाही. तृणमूलचा उमेदवार असावा अशी मागणी तृणमूलने केली आहे. मात्र याबाबत अद्याप कोणत्याही पक्षाकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. राज्यसभेत एकूण २४५ जागा आहेत ज्यापैकी ११५ जागा एनडीएकडे आहेत. त्यापैकी ७३ जागा भाजपाकडे आहेत.
यूपीएकडे ११३ जागा आहेत ज्यापैकी ३० जागा काँग्रेसकडे आहेत. विरोधकांपैकी काँग्रेसच असा पक्ष आहे ज्यांचे राज्यसभेत सर्वाधिक खासदार आहेत. उपसभापतीपदी असलेले पी.जे. कुरियन यांचा कार्यकाळ २ जुलै रोजी संपला आहे. त्यामुळे आता हे पद रिक्त झाल्याने त्यासाठी निवडणूक घेण्यात येते आहे. काँग्रेसमध्ये नसलेल्या उमेदवारालाही पाठिंबा द्यायची तयारी काँग्रेसने दर्शवली आहे असे समजते आहे. आता काँग्रेस कोणाला उमेदवारी देणार ते बुधवार पर्यंत स्पष्ट होण्याची शक्यता आहे.