राज्यसभेवर जाण्यास राणे तयार!

0

नाथाभाऊंनाही राज्यसभेवर पाठविण्याचा घाट

मुंबई : राज्यसभेच्या तीन जागांपैकी एका जागेसाठी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी शुक्रवारी अर्ज भरला आहे. आता दुसर्‍या जागेसाठी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे अखेर अर्ज भरण्यास तयार झाल्याचे समजते. त्याचबरोबर तिसर्‍या जागेसाठी ज्येष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांना भाजपने गळ घातल्याचे सूत्रांनी सांगितले.

प्रकाश जावडेकरांनी भरला अर्ज
महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागा रिक्त होत असून, त्यासाठी निवडणूक जाहीर झाली आहे. भाजपच्या वाट्याला संख्याबळानुसार तीन जागा आहेत. त्यापैकी एका जागेसाठी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी शुक्रवारी अर्ज भरला आहे. राज्य मंत्रिमंडळात येण्यास इच्छूक असलेले नारायण राणे हे राज्यसभेच्या उमेदवारीसाठी नाखूश होते. मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटून राणे यांनी तसे बोलूनही दाखवले होते. मात्र राज्यसभा वगळता इतर पर्याय शक्य नसल्याचे राणे यांना कळवण्यात आले. त्यामुळे आता दुसरा मार्ग नसल्याने राणे राज्यसभेसाठी तयार झाल्याचे राजकीय सूत्रांनी सांगितले. त्याचबरोबर तिसर्‍या जागेसाठी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना गळ घातली आहे. खडसे हे राज्यातच राहण्यास इच्छुक आहेत. याबाबत विचारणा करता, पक्षाने जर आदेश दिला तर त्याबाबत विचार करता येईल, असे एकनाथ खडसे यांनी सांगितले.

58 जागांसाठी 23 मार्चला मतदान
16 राज्यातील एकूण 58 जागांसाठी 23 मार्चला मतदान होणार आहे. एप्रिल महिन्यात राज्यसभेचे 58 खासदार निवृत्त होणार आहेत. उत्तरप्रदेशातील सर्वाधिक 10, तर महाराष्ट्रातील 6 जागांचा समावेश आहे. 23 तारखेला सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. त्याचदिवशी संध्याकाळी 5 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. विधानसभेचे संख्याबळ पाहता, तीन जागांवर भाजपचा विजय निश्‍चित मानला जातो. काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर नारायण राणेंनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्थापन करुन एनडीएत सहभाग घेतला. मात्र राज्यातील मंत्रिपदाच्या आशेवर असणारे राणे आता राज्यसभेसाठी तयार झाल्याचे वृत्त आहे. एकनाथ खडसे यांचेही राज्यसभेतून पुनर्वसन करण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे.