चाळीसगाव: राजमाता अहिल्यादेवी फाऊंडेशन अमरावतीच्या वतीने ११ सप्टेंबर मंगळवार रोजी अमरावती स्थित संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे राज्यस्तरीय अहिल्यादेवी स्त्री शक्तीपीठ पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री प्रविण पोटे पाटील, खा.पद्मश्री विकास महात्मे, खा.आनंदराव अडसूळ, आ.यशोमती ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा दिमाखदार सोहळा संपन्न झाला यावेळी मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर (कला) मॅरेथॉन धावपटू लता करे (क्रीडा),चाळीसगाव येथील स्वयंदीप संस्थेच्या संस्थापिका मिनाक्षी निकम (उद्योजिका),अहमदनगर येथील माऊली संस्थेच्या डॉ.सुचेता धामणे (समाजसेवा) यांना राज्यस्तरीय अहिल्यादेवी स्त्रीशक्ती पुरस्काराने गौरविण्यात आले.
राजमाता अहिल्यादेवी फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष महात्मे,उपाध्यक्ष डॉ.गणेश काळे,सचिव माधुरी ढवळे,सहसचिव क्षिप्रा मानकर,कोषाध्यक्ष रविंद्र गोरटे,अशोकराव गंधे, जानराव कोकरे, हरिभाऊ शिंदे, जिनत पटेल, सुषमा बिसने, ज्योती वानखेडे यांच्या वतीने दरवर्षी पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात येत असते.
माझ्यासोबत माझ्या गावाचा सन्मान – मिनाक्षी निकम
माझ्या दिव्यांग बंधू भगिनी यांना आर्थिक स्वयंपूर्ण करण्यासाठी मी पहिले पाऊल टाकले त्याला माझ्या चाळीसगावकरानी भरभरून प्रेम दिले त्यामुळे मला मोठी मजल मारता आली आहे पुरस्कार स्वीकारताना माझे व चाळीसगाव चा उल्लेख होताना ऊर भरून आले होते अशी भावना स्वयंदीप संस्थेच्या आधारस्तंभ उद्योजिका मीनाक्षी ताई निकम यांनी व्यक्त केली आहे.