राज्यस्तरीय लावणी स्पर्धेत जय अंबिका केंद्राची बाजी

0

यवत । सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथील स्व. शंकरराव मोहिते पाटील जयंती समिती यांनी आयोजित केलेल्या 26 व्या राज्यस्तरीय लावणी स्पर्धेत शिरुर तालुक्यातील सणसवाडी येथील जय अंबिका कला केंद्राने बाजी मारली. तर दौंड तालुक्यातील केडगाव चौफुला येथील न्यू अंबिका सांस्कृतिक कला केंद्राने पारंपरिक गटात दुसरा क्रमांक पटकावला आहे.

लावणी कलावंतासाठी महत्त्वाची मानली जाणारी ही स्पर्धा नुकतीच अकलूज येथे पार पडली. जय अंबिका कला केंद्र व न्यू अंबिका कला केंद्र यांच्यात चुरस झाली. अखेर एका गुणाने सणसवाडी कला केंद्राला प्रथम क्रमांक देण्यात आला. परंतु न्यू अंबिका कला केंद्राने छक्कड हा लावणी प्रकार सादर करून रसिकांनी मने जिंकली. तिसरा क्रमांक नटरंग कला केंद्र मोडनिंब व पद्मावती कला केंद्र मोडनिंब यांच्यात विभागून देण्यात आला. तसेच या वर्षीचा राज्यस्तरीय लावणी कलावंत हा पुरस्कार रघुवीर खेडकर यांना देण्यात आला. उत्कृष्ट मुजरा प्रथम पुरस्कर देखील न्यू अंबिका कला केंद्राला देण्यात आला. दोन दिवस सुरू असणार्‍या या स्पर्धेत व्यावसायिक तर पारंपरीक गट अशी स्पर्धा घेण्यात आली.

श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते उद्घाटन
या लावणी स्पर्धेचे उद्घाटन सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी खासदार विजयसिंह मोहिते पाटील, आमदार हनुमंतराव डोळस, बार्शीचे आमदार दिलीप सोपल, सोलापूरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भारुड, सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख व स्पर्धेचे आयोजक जयसिंह मोहिते पाटील, महाराष्ट्र राज्य रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे सदस्य अशोक जाधव व जयश्री जाधव तसेच मोठ्या संख्येने राज्यभरातून लावणी कलावंत उपस्थित होते.