धुळे । राज्यात 1 ते 7 जुलै दरम्यान 4 कोटी वृक्ष लागवड मोहीम राबविण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्याचे एकूण उद्दिष्ट 8.02 लक्ष पैकी 4.12 लक्ष इतके उद्दिष्ट वनविभागाला देण्यात आले आहे. या उद्दिष्टानुसार वन विभागाकडून वन क्षेत्रातील कमी झाडोरा असलेल्या 36 ठिकाणांची निवड करण्यात आली असून जिल्हाभरातील वृक्ष लागवडीसाठी वन विभागाच्या 29 तर सामाजिक वनिकरणाच्या 4 रोपवाटिकांमध्ये एकूण 62.58 लक्ष रोप लागवडीसाठी तयार आहेत. एकूण या वृक्ष लागवडीसाठी वन विभागाचे पूर्व तयारी पूर्ण झाली असून यासाठी वन विभाग सज्ज असल्याची माहिती उपवनसंरक्षक जी.के.अनारसे यांनी आज दिली.
वन विभागातर्फे सुक्ष्म नियोजन
शिंदखेडा तालुक्यातील 3 रोपवन स्थळाच्या 75 हेक्टर क्षेत्रामध्ये 95 हजार 525 रोपे, साक्री तालुक्यातील 9 रोपवन स्थळाच्या 222 हेक्टर क्षेत्रामध्ये 1 लाख 69 हजार 750 रोपे तर शिरपूर तालुक्यातील 13 रोपवन स्थळांच्या 301.04 हेक्टर क्षेत्रामध्ये 3 लाख 99 हजार 384 इतक्या रोपांची लागवड करण्यात येणार असून दिलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिक म्हणजे 9 लाख 37 हजार 283 इतक्या रोपांची लागवड ही केवळ वनविभागामार्फत करण्याचे सुक्ष्म नियोजन वन विभागाने केले आहे.
नागरिकांना सहभागाचे आवाहन
संगणक प्रणालीत रोपवनस्थळांची माहिती अद्यावत करण्याचे काम सुरु आहे. ग्रीन आर्मी या पोर्टलव्दारे सभासद नोंदणी सुरू आहे, यात धुळे जिल्ह्यातील 30842 इतकी नोंदणी झाली असून जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांनी या पोर्टलव्दारे सभासद नोंदणी करुन प्रमाणपत्र प्राप्त करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केल. वनविभागाकडून रोपे आपल्या दारी हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. तरी नागरिकांना या योजनेत सहभाग नोंदवून वृक्ष लागवडीत आपला वाटा उचलावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
तालुक्यातील 11 रोवनस्थळांची निवड
शासनाच्या 4 कोटी वृक्ष लागवडीच्या अनुषंगाने वन विभागाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांना माहिती देतांना ते बोलत होते. यावेळी सहाय्यक उपवनसंरक्षक संजय पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी पी.एच.पाटील, वनपाल बी.एस.भामरे आदि उपस्थित होते. यावेळी बोलतांना उपवनसंरक्षक श्री.अनारसे म्हणाले, वन विभागामार्फत धुळे तालुक्यातील 11 रोपवनस्थळांची निवड करण्यात आली असून 252.21 हेक्टर क्षेत्रात 2 लाख 72 हजार 624 रोपांची लागवड होणार आहे.