राज्यस्तरीय शेतकरी परिषदेला आदिवासी बांधव लावणार हजेरी

0

जळगाव । सुकाणू समितीची राज्यस्तरीय शेतकरी कर्जमुक्ती व हमीभाव शेतकरी परिषद मंगळवार 26 रोजी नुतन मराठा महाविद्यालयाच्या बोस सभागृहात होणार आहे. या परिषदेला राज्याभरातून 30 हजारांपेक्षा अधिक शेतकरी आणि आदीवासी सहभागी होतील अशी माहिती सुकाणू समिती सदस्या व लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी सुकाणू समिती सदस्य मुकुंद सपकाळे, सचिन हांडे, पियुष पाटील, दिलीप सपकाळे, शंभू पाटील,किरण भोळे आदी उपस्थित होते.

किसान यात्रेस सुरूवात
प्रतिभा शिंदे यांनी सांगितले की, शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमाफी करण्याची पोकळ घोषणा करत रोज नवनवीन आमिष दाखवून शेतकर्‍याला फसविले जात आहे. दसरा, दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपला असतांना शेतकर्‍याला पुन्हा चावडीवाचनावर वेळ वाया घालवत शेतकर्‍यांना अमिष दाखवून वेळ मारून नेत असल्याचा आरोप शिंदे यांनी केला. या सर्व फसव्या योजनांचा पर्दाफाश करण्यासाठी राज्यातील प्रत्यक जिल्ह्यांतून शेतकरी प्रतिनिधी आणि शेतकरी प्रश्‍नांशी निगडीत व्यक्ती मोठ्या संख्येने जिल्ह्यात येत आहे अशी माहिती शिंदे यांनी दिली. जिल्ह्यांत जनजागृतींसाठी 30 रिक्षा लावण्यात आल्या असून ठिकठिकाणी 1000 पेक्षा जास्त पोस्टर तर 10 हजार पत्रके वाटण्यात आली आहेत. महात्मा फुले यांच्या गावापासून 15 सप्टेंबर पासून किसान जागर यात्रा निघाली आहे. यासोबत किसान सभेने 7 ते 15 सप्टेंबर यात्रा काढण्यात आल्या आहेत. त्याचा समारोप जिल्ह्यांत होणार आहे. यासभेला रघुनाथदादा पाटील, खासदार राजु शेट्टी, डॉ. बाबा आढाव, आमदार बच्चु कडू, डॉ. अजित नवले, शेकापचे आमदार जयंत पाटील, अशोक ढवळे, संजय घाटणेकर आदी उपस्थित राहणार आहेत.

शेतकर्‍यांनी भरले कर्जमाफी अर्ज
जळगाव जिल्हयातुन 4 लाख शेतकार्‍यांनी कर्जमाफीचे अर्ज ऑन लाईन भरले आहे. अशी माहिती देण्यात आली असली. तरी प्रत्यक्षात 2 लाख 80 हजार शेतकर्‍यांनी जिल्हयातून कर्जमाफीचे अर्ज भरले आहेत. चावडी वाचन झाले असता प्रत्यक्षात लाभार्थी शेतकर्‍यांची संख्या अल्प आहे. अनेक शेतकर्‍यांच्या हाताच्या रेषा कामामुळे पुसल्या गेल्या आहेत त्यामुळे त्यांना ऑन लाईन अर्ज भरणे अवघड झाले. ना.गिरिश महाजनांनी कापसाला 7 हजार रुपये हमी भाव मिळावा म्हणून उपोषण केले होते. त्यांना आम्ही पाठिंबा दिला होता. पण सत्ता आली की माणसाचे बोल बदलतात त्याचा प्रत्येय आला आहे.1990 नंतर प्रथमच मोठे आंदोलन या परिसरात होत आहे. शेतकर्‍यांना संपुर्ण कर्जमुक्ती झाली पाहिजे यासाठी हे आंदोलन आहे अशी माहिती या प्रसंगी देण्यात आली.