चोपडा। नंदुरबार येथील ज्येष्ठ छायाचित्रकार स्व.रामभाऊ जगन पाटील स्मृती प्रतिष्ठानतर्फे आयोजित भव्य राज्यस्तरीय छायाचित्र स्पर्धा व प्रदर्शनात चोपडा येथील फोटोग्राफर भगवान भाऊलाल उर्फ छोटू वारडे यांना गौरविण्यात आले. दरम्यान स्टेशन रोड नंदुरबार भागात हे प्रदर्शन भरविण्यात आले होते. छायाचित्रकार केवळ छायाचित्रण करीत नाही तर आपल्यातील कौशल्य गुणांचा वापर करून तो कलात्मक प्रतिमा साकारत असतो, अशा शब्दात यावेळी कार्यक्रमात उपवनसंरक्षक श्रीमती पियुषा जगताप यांनी फोटोग्राफर मंडळींचा गौरवपूर्वक उल्लेख केला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डीवायएसपी राजेंद्र पवार होते.
व्यासपिठावर उद्योगपती मनोज रघुवंशी, नगरसेवक विलास रघुवंशी, स्व.रामभाऊ प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन पाटील, व्यावसायीक फोटोग्राफर संघटनेचे अध्यक्ष मानसिंग राजपूत, प्रशांत पाटील व मान्यवर हजर होते. चोपड्यातील उत्कृष्ट छायाचित्रकार म्हणून यावेळी माजी उपनगराध्यक्ष ईश्वर चौधरी यांनी प्रमाणपत्र देऊन वारडे यांना सन्मानित केले. फोटोग्राफर छोटू वारडे यांची निवडक छायाचित्रे प्रदर्शनात ठेवण्यात आली होती. त्यांच्या या यशाबद्दल पटेल फोटो स्टुडीओचे राजेंद्र पाटील, चित्ते सर, विजय मोहन पाटील, कवी रमेश पाटील, नंदकुमार पाटील आदींनी कौतुक केले आहे.