अपर पोलीस महासंचालकांच्या हस्ते गौरव ; संगणक जनजागृती स्पर्धेत राज्यातून दुसर्या क्रमांकाने यश
जळगाव- महाराष्ट्र राज्य गुप्त वार्ता प्रबोधनी पुणे येथे विविध विषयांवर राज्यस्तरीय स्पर्धा पार पडली. यात संगणक जनजागृती स्पर्धेत (कॉम्प्युटर अवेअरनेस कॉम्पिटिशन) महाराष्ट्र राज्यातून जिल्ह्यातील सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल संदीप अशोक नन्नवरे या कर्मचार्याने दुसरा क्रमांकासह रजत पदक पटकाविले आहे. या यशाबद्दल नन्नवरे यांचा मंगळवारी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांच्या सत्कार करण्यात आला.
पुणे येथे 25 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या काळात महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळावा पार पडला. पोलीस फोटोग्राफी, पोलीस व्हिडीओग्राफी, डॉग स्कॉड यासह विविध विषयांवर राज्यस्तरीय स्पर्धा पार पडल्या. यात जळगाव जिल्ह्याचे सायबर पोलीस स्टेशनेच पोलीस कॉन्स्टेबल संदीप नन्नवरे यांची संगणक जनजागृती या विषयावर स्पर्धेसाठी निवड करण्यात आली होती. यात नन्नवरे यांनी राज्यातून दुसरा क्रमांक पटकावून जिल्हा पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. याबद्दल महाराष्ट्र राज्याचे गुन्हे अन्वेषण विभागाचे अपर पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी यांच्या हस्ते नन्नवरे यांना रजत पदक देवून गौरविण्यात आले.
पोलीस महासंचालकांकडून अभिनंदन
संगणक जनजागृती या विषयाला अनुसुरुन स्पर्धेसाठी नन्नवरे यांना पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके , सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक डी.के.परदेशी यांचे मार्गदर्शन लाभले होते. या कामगिरी बद्दल संदीप नन्नवरे यांचे महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जैस्वाल यांनी व्टिटरव्दारे, तसेच नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. छेरिंग दोरजे यांनी देखील अभिनंदन केले आहे.