राज्याच्या किनारपट्टीवर ‘ओखी’चे संकट!

0

मुंबई : केरळ आणि तामिळनाडूच्या किनारपट्टीवर धुमाकूळ घालणार्‍या ओखी चक्रीवादळाचे संकट आता राज्याच्या किनारपट्टीवर घोंघावत आहे. कोकण आणि महाराष्ट्राच्या किनारपट्ट्यांवर त्याचे परिणाम सोमवारी जाणवू लागले होते. राज्यासह गुजरात किनारपट्टीलाही हायअ‍ॅलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, सोमवारी रात्री मुंबई, ठाण्यात तुरळक पाऊस पडला. वार्‍याचा वेगही वाढला होता. कोकण किनारपट्टीतल्या सर्वच जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 6 तारखेपर्यंत ओखीचे संकट राज्यावर असून, त्यांनतर ते गुजरातकडे सरकणार आहे. सोमवारी पुण्यासह अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण होते. तसेच तापमानातही वाढ झाल्याचे दिसून आले.

48 तासात पावसाची शक्यता
सोमवारी ओखी वादळाचा फटका रायगडच्या समुद्रकिनार्‍याला बसला आहे. उरण समुद्रकिनारी 4 ते 5 छोट्या बोटी बुडाल्या. रायगड-उरण ते मुंबई दरम्यानची प्रवासी लाँच सेवा बंद ठेवण्यात आली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर आणि मुंबई किनारपट्टीतही अतिसतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुढील 48 तासात ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मुंबई लगतच्या अरबी समुद्राला ओखी वादळाच्या धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.

सिंधुदुर्ग, रत्नागिरीला तडाखा
सिंधुदुर्ग जिल्ह्यातही ओखी वादळाचा परिणाम पाहायला मिळाले. मालवण, वेंगुर्ले, देवगड समुद्र किनार्‍यावर तडाखा बसला आहे. कोचरा-देवबागला समुद्राचे पाणी वस्तीत शिरले. किनार्‍यावरील मच्छीमार बांधव आणि स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तर मालवण तालुक्यातील आचरा, मेढा, दांडी, किनारपट्टीलाही समुद्राच्या उधाणाचा तडाखा बसला. पिरावाडी गावाशी संपर्क तुटला तर देवबागमध्ये कुर्लेवाडीत पाणी शिरले होते. रत्नागिरीतही अनेक किनारपट्टीच्या भागात समुद्राचे पाणी किनार्‍याच्या भागात शिरले आहे. लाटांचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे किनारपट्टीवरच्या भागातील गावांना अतिसतर्कतेचा इशारा दिला आहे.