राज्याच्या तिजोरीतून शेतकरी कर्जमाफी अशक्य

0

मुंबई : राज्यातील शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्याची मागणी आणि भूमिका रास्त असली तरी सरसकट शेतकर्‍यांना कर्जमुक्त करता येणार नाही. जर शेतकर्‍यांना कर्जमाफी दिली तर इतर विकास कामांना निधी देणे शक्य होणार नाही. जर निधी दिला नाही तर विकास कसा होणार असा सवाल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करत राज्यातील पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी कर्ज मिळू शकते. मात्र शेतकर्‍यांच्या कर्जमुक्तीसाठी मिळणे शक्य नसल्याने सरसकट शेतकर्‍यांना कर्जमुक्ती देता येणे शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

तसेच कर्जमाफी होईल या आशेने जे शेतकरी कर्जाचे हप्ते कर्जाचे हप्ते भरत नसतील त्यांनी कर्जाचे हप्ते भरावेत असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.
विधानसभेत बुधवारी अर्थसंकल्पातील विभागवार चर्चेच्यावेळी हरकतीच्या मुद्द्याद्वारे शिवसेनेचे आमदार उन्मेश पटेल, शंभुराजे देसाई, डॉ. जयप्रकाश मुंदडा, अनिल कदम, अनिल साबणे विजय औटी यांनी शेतकर्‍याना कर्जमाफी देण्याची मागणी केली होती. त्यास उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी वरील माहिती दिली.

राज्यात 1 कोटी 31 लाख शेतकरी असून त्यापैकी 31 लाख शेतकर्‍यांच्या कर्जमाफीबाबत राज्य सरकार सकारात्मक विचार करत आहे. या अनुषंगाने केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांचीही याप्रश्नी भेट घेतली. त्यांनीही याबाबत सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले. मात्र शेतकर्‍यांना कायमचे कर्जमुक्त करायचे असेल तर त्यांना क्रेडिट सिस्टीमखाली आणणे गरजेचे आहे. तसेच त्यांना क्रेडिट सिस्टीमखाली आणल्यानंतरच कर्जमातून मुक्त करणे शक्य होणार आहे. त्याचबरोबर राज्य आणि केंद्र सरकारच्यासंयुक्त विद्यमाने कर्जमुक्ती तयार करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.

शेतकर्‍यांना कर्जमुक्त करण्यासाठी शेतकर्‍यांच्या मालाला हमी भाव द्यावा लागणार आहे. हमी भाव हा त्याच्या उत्पादनात वाढ झाल्यावर मिळणे शक्य होणार असून त्यासाठी शेती मालाचे उत्पादन वाढवावे लागणार आहे. त्यासाठी आतापर्यंत राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणावर शेतीत गुंतवणूक वाढविली आहे. तसेच फूड प्रोसेसिंग प्रकल्प कार्यान्वित करण्याचे धोरणही स्विकारण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

शेतकर्‍यांना कर्जमाफी देवून फक्त सहकारी बँकाचेच भले होवू नये तर शेतकर्‍यांचे भले व्हावे यासाठी सर्वबाजूंनी पाहून निर्णय घेण्यात येत आहे. त्यादृष्टीने शिवसेना कार्यप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याशी चर्चा केली असून एक दिवसांत कर्जमाफीचा निर्णय घेता येणार नसल्याचे सांगत पण कॉग्रेस व राष्ट्रवादीकडून शिवसेनेच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा टोलाही त्यांनी यावेळी केला.

कर्जमाफीच्या निमित्ताने सरकारमधून शिवसेना बाहेर पडू नये यादृष्टीने शिवसेनेला चुचकारत मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी कशी देता येत नाही हे उत्तमरित्या पटवून दिले. तसेच दुसर्‍याबाजूला काँग्रेस, राष्ट्रवादीला त्यांनी फटकारत त्यांच्या ताब्यातील सहकारी बँकांच्या फायद्यासाठी कर्जमाफी देणार नसल्याचे स्पष्ट केले.