मुंबई । कृषी प्रक्रिया उद्योगामध्ये देशात होणार्या एकूण गुंतवणुकीपैकी सर्वाधिक 30 टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात होणार आहे. नवी दिल्ली येथे झालेल्या वर्ल्ड फूड इंडिया परिषदेच्या माध्यमातून जगभरातील अनेक गुंतवणूकदारांनी राज्यात अन्न प्रक्रिया उद्योगात गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली आहे, अशी माहिती कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी सोमवारी एका पत्रकार परिषदेत दिली.
इतर राज्यांच्या तुलनेत अन्नप्रक्रिया उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र अग्रेसर आहे. अन्नप्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. या माध्यमातून शेतकर्यांच्या उत्पन्नात दुपटीने वाढ करण्याचा प्रयत्न आहे. राज्याने अन्नप्रकिया उद्योगांसाठी विविध परदेशी कंपन्यांशी चर्चा केली. केवळ स्थानिक शेतकर्यांचाच शेतमाल विकत घेऊन त्यावर प्रक्रिया करून त्याचे उत्पादन तयार करण्याच्या निकषावरच परकीय गुंतवणूकदारांना गुंतवणुकीची संधी देण्यात येईल. परिणामी, स्थानिक शेतकर्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळणार आहे, असेही ते म्हणाले.