राज्यातील आदिवासी समाजाच्या विकासासाठी शासन कटीबद्ध : नंदुरबार शहरात मुख्यमंत्री शिंदे

Big industries will come in the state; Four hundred decisions for the development of common people in four months: Chief Minister Eknath Shinde नंदुरबार : राज्यातील आदिवासी समाजाच्या विकासासाठी कालबद्ध कार्यक्रम आखुन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन कटीबद्ध असून राज्यातील तरुणांना रोजगार देण्यासाठी राज्यात मोठे उद्योगधंदे येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी येथे देत चार महिन्यात जनतेच्या हितासाठी चारशे शासन निर्णय घेतल्याचेही सांगितले. नंदुरबार नगरपरीषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री शिंदे यांच्याहस्ते शनिवारी श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात झाला. याप्रसंगी ते बोलत होते.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
कार्यक्रमास आदिवासी विकासमंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावीत, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील, कृषिमंत्री अब्दुल सत्तार, बंदरे आणि खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, खासदार डॉ. हिना गावीत, खासदार राजेंद्र गावीत आदी उपस्थित होते.

चार महिन्यात चारशे निर्णय
मुख्यमंत्री म्हणाले की, आदिवासी समाजासाठी अर्थसंकल्पात भरघोस निधीची तरतूद केली आहे. राज्यातील विकास कामांना गती व चालना देण्याचे काम हे सरकार करीत असून हे सरकार आदिवासी, शेतकरी, कष्टकरी, कामगार, वंचित- शोषित अशा सगळ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. सर्व समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी गत चार महिन्यात 400 पेक्षा अधिक शासन निर्णय काढण्यात आले आहेत.

नंदुरबारसह नवापूरसाठी केली ही घोषणा
नंदुरबार शहरातील रस्ते,पथदिवे,पाणीपुरवठा तसेच विविध विकासकामांसाठी नगरोत्थान योजनेतून निधी उपलब्ध करुन देण्यात येईल तसेच नवापूरमधील 132 के.व्ही विद्युत उपकेंद्रासाठी एमआयडीसीमध्ये जागा उपलब्ध करुन देण्यात येईल. नंदुरबार नगर परिषदेची नूतन इमारत अतिशय सुंदर आणि सुसज्ज असून नागरिकांना त्याचा लाभ होईल, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.

नुकसानीची मर्यादा तीन हेक्टरपर्यंत
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यातील 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरीकांसाठी मोफत एसटी बस प्रवासाची योजना सुरू केली. 52 दिवसांमध्ये या योजनेचा एक कोटीपेक्षा अधिक ज्येष्ठांनी लाभ घेतला. दिवाळीसाठी शिधापत्रिकाधारकांना ‘आनंदाचा शिधा’ केवळ 100 रुपयांत देण्यात आला असून अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांना अधिकाधिक मदत मिळावी याकरिता नुकसानीची मर्यादा 3 हेक्टरपर्यंत वाढविण्यात आली आहे. नुकसान भरपाईपोटी जवळपास 30 लाख शेतकर्‍यांना सहा हजार कोटींची मदत देण्यात आली आहे. नियमित कर्ज फेडणार्‍या शेतकर्‍यांना प्रोत्साहनपर रक्कम देण्याचा निर्णय घेऊन एकाच वेळी सुमारे सात लाख शेतकर्‍यांच्या खात्यात 2500 कोटी रुपये जमा केले असून लघूसिंचन योजनेच्या वीज बिलात प्रति युनिट एक रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकर्‍यांचा सेंद्रीय शेतीकडे कल वाढावा म्हणून त्यांना प्रोत्साहन देण्यात येत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

नगरपरीषदेला दिली दिवाळी भेट
यावेळी मुख्यमंत्र्यांनी नंदुरबार नगरपरीषदेची थकित सात कोटी 28 लाख रुपयांचा निधी त्वरित मंजूर करीत नंदुरबारवासीयांना विशेष भेट यावेळी दिली. नंदुरबार नगरपरीषदेमार्फत प्रत्येक नागरीकांचा अपघात विमा काढण्यात आला असून अपघातग्रस्त तीन लाभार्थींना यावेळी प्रत्येकी एक लाख रुपयांचा धनादेश वितरीत करण्यात आला.

नूतन प्रशासकीय इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते नंदुरबार नगरपरीषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. मुख्यमंत्री व मान्यवरांनी नगरपरिषदेच्या इमारतीची पाहणी केली. इमारत उभारण्यासाठी 15 कोटी 19 लाख एवढा खर्च झाला आहे.