राज्यातील कोरोना बाधितांची संख्या ६३ वर

0

मुंबई: राज्यात कोरोना विषाणूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा कालपर्यंत ५२ असलेला आकडा आज थेट ११ ने वाढून ६३ वर पोहोचला आहे. यात मुंबईतील दहा तर पुण्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भेट घेतल्यानंतर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी राज्यातील सद्यस्थितीची माहिती दिली. ‘महाराष्ट्र सध्या ‘करोना’च्या दुसऱ्या टप्प्यात आहे. मात्र, परिस्थिती अशी कायम राहिल्यास चिंता वाढू शकते, असं टोपे म्हणाले.

राज्यातील एकूण ६३ रुग्णांपैकी १४ लोकांना संसर्गातून करोनाची लागण झाली आहे. आज सापडलेल्या ११ रुग्णांपैकी आठ जण विदेशातून आले होते. तर, तिघांना संसर्गातून लागण झाल्याचं टोपे यांनी सांगितलं. जनतेनं खबरदारी घेण्याचं आवाहन आरोग्यमंत्र्यांनी यावेळी केलं. ‘घरातील, ऑफिसमधील एसी बंद ठेवा. लोकलचा वापर टाळा. रेल्वे स्थानकांतील गर्दी कमी करा, अशा सूचना त्यांनी दिल्या.

रेल्वे स्थानकांवरील गर्दी कमी करण्यासाठी मुंबईतून बाहेर जाणाऱ्या रेल्वे वाढवण्याची विनंती केंद्र सरकारकड केली आहे, असं टोपे यांनी सांगितलं. सर्व महापालिकांना आर्थिक पुरवठा करण्यात आलाय आणि ‘करोना’ संदर्भातील उपचारसाधनांसाठी तो थेट वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.तसेच अर्थव्यवस्थेवर खूप मोठा परिणाम होतोय याचा विचार करण्याची मागणी केंद्राकडं केलीय.