मुंबई: राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असून, त्यांचे नावे जाहीर करण्याची मागणी महाराष्ट्र नव निर्माण सेनेने राज्यसरकार कडे केली आहे. कोरोना विषाणूची लागण होण्याच्या भीतीनं काही ठिकाणी करोनाच्या ग्रस्तांना व संशयितांना बहिष्काराचा सामना करावा लागत असल्याच्या घटना पुढं आल्या आहेत. त्यामुळं खबरदारी म्हणून करोनाच्या रुग्णांची नावं जाहीर न करण्याची भूमिका सरकारनं घेतली आहे.
‘कोरोनाची लागण झालेले लोक हे कोणी गुन्हेगार नाहीत. त्यांना एचआयव्हीसारख्या रोगाची लागण झालेली नाही. अनावधानानं ते विषाणूच्या संपर्कात आलेले आहेत. त्यामुळं त्यांची ओळख लपवण्याचं कारण नाही. उलट त्यांची नावं जाहीर केल्यास त्यातून जनजागृती होईल. संबंधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनाही त्याची माहिती मिळेल व खबरदारी म्हणून ते स्वत:हून चाचण्या करण्यासाठी पुढं येतील, असं मत मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केले आहे.