मुंबई : ग्रामीण भागातील जि.प. व पंचायत समिती निवडणुकांसाठी रणधुमाळी सुरू झाली असतानाच शुक्रवारी राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील जिल्हा परीषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांना स्थगिती दिल्याने इच्छूकांच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे.
अधिसूचना प्रसिद्धीच्या दिवशीच निवडणुकांना स्थगिती
25 जिल्हा परीषदा व त्यांतर्गतच्या 284 पंचायत समित्यांच्या आरक्षणाची अंतिम अधिसूचना शुक्रवार, 5 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात येणार होती. त्याचबरोबर 13 जिल्हा परीषदा व त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांची केंद्रनिहाय मतदार यादी 8 ऑगस्ट 2022 रोजी तर 12 जिल्हा परीषदा व त्यांच्यातर्गतच्या पंचायत समित्यांची प्रारूप मतदार यादी 10 ऑगस्ट 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार होती. आता ही सर्व प्रक्रिया आहे त्या स्तरावर स्थगित करण्यात आली असल्याची घोषणा निवडणूक आयोगाने केली.
या जिल्ह्यातील निवडणुका लांबणीवर
या घोषणेमुळे जळगावसह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर व गडचिरोलीच्या जिल्हा परीषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत.