पुणे : राजस्थान व गुजरातमध्ये गेले तीन- चार दिवस अँटी सायक्लोन वातावरण होते. त्यामुळे तेथे उष्णता वाढली होती. तेथील उष्ण वारे गेले दोन दिवस राज्याच्या दिशेने वाहत असल्याने राज्यातील तापमान वाढले होते. मात्र, पुढील दोन दिवसांत राज्यातील तापमान कमी होऊन नागरिकांना दिलासा मिळेल, असे हवामान अभ्यासकांनी जनशक्तिशी बोलताना सांगितले.
राज्यात गेले दोन दिवस उन्हाचा कडाका वाढला होता. तसेच, राज्यातील बहुतांश ठिकाणचे तापमानही 40 अंशांच्या पुढे गेले होते. त्यामुळे नागरिकांची काहिली झाली. मार्चच्या अखेरीसच अचानक वाढलेल्या तापमानामुळे राज्यातील जनजीवनही विस्कळीत झाले होते. एप्रिल व मेमध्ये तापमान आणखी वाढणार का, अशी चिंताही नागरिक व्यक्त करत आहेत.
नॅशनल क्लायमेट सेंटरचे संचालक व हवामानाचे संचालक ए. के. श्रीवास्तव जनशक्तिशी बोलताना म्हणाले, की राजस्थान व गुजरातमध्ये अचानकच अँटी सायक्लोन स्वरुपाचे वातावरण निर्माण झाले आणि त्यातून तापमान वाढले. तेथील उष्ण वारे आपल्या राज्याकडे वाहत होते. त्यामुळे राज्यातील तापमान अचानकच वाढले. मात्र, विदर्भ वगळता राज्यात कोठेही उष्णतेची लाट नव्हती.
उकाडा होणार कमी
राज्यात आजपासून तापमानात घट होऊ लागेल, असे सांगून श्रीवास्तव म्हणाले, की पुढील दोन दिवसांत राज्यातील तापमान हळूहळू कमी होऊन पाराही 40 अंशांच्या आत येईल. पुण्यात पुढील दोन दिवसांत 38 अंशांपर्यंत तापमान राहील. सर्वसमान्य तापमानापेक्षा एक- दोन अंशांनी तापमान जास्त राहणार असले, तरी उकाडा नियंत्रणात असेल.
भीरात अभ्यासकांचे पथक दाखल
रायगड जिल्ह्यातील भीरा येथे मंगळवार, बुधवारी 46.5 अंश इतके विक्रमी तापमान नोंदले गेले. तेथे इतके तापमान का नोंदवले गेले, याच्या अभ्यासासाठी हवामान विभागाने गुरुवारी अभ्यासकांचे पथक पाठवले आहे. हे पथक गुरुवारी दिवसभर भीरा परिसराची पाहणी करणार आहे. या पथकाच्या निरीक्षणानंतरच याबाबत काही भाष्य करता येईल, असेही श्रीवास्तव यांनी सांगितले.
सर्वाधिक उष्ण वर्ष
राज्यातील सध्याचे तापमान चांगल्या मॉन्सूनसाठी पूरक ठरार असल्याचे कृषी हवामानतज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी जनशक्तिशी बोलताना सांगितले. 1998 मध्ये राज्यात असेच वातावरण होते. त्यानंतर 19 वर्षांनी आपण पुन्हा असे वातावरण अनुभवत आहोत. एकुणच जागतिक हवामानाचा विचार करता सध्याचे वर्ष सर्वाधिक उष्ण वर्ष ठऱणार आहे, असे ते म्हणाले. राज्यात एप्रिलच्या अखेरीस पुन्हा उन्हाचा कडाका वाढण्याची शक्यता असल्याचेही डॉ. साबळे यांनी सांगितले.
विदर्भात पावसाची शक्यता
विदर्भ व मराठवाड्याच्या पूर्व भागात तापमान चांगलेच वाढले आहे. तेथे उष्णतेची लाट असल्याचे दिसते. ही बाब लक्षात घेता त्या भागात पुढील आठवड्यात पावसाच्या सरी येण्याची शक्यता आहे. मराठवाड्याच्या पूर्वभागात काही ठिकाणी गारांचा पाऊसही बरसू शकले, असा अंदाज डॉ. साबळे यांनी वर्तवला.