राज्यातील तीन सैनिकी शाळांतील 36 शिक्षक पदांना अनुदान

0
मुंबई :- राज्यातील तीन सैनिकी शाळांतील अतिरिक्त 18 तुकड्यांतील 36 शिक्षक पदांना मंजुरी देण्यात आली असून त्यासाठी 20 टक्के अनुदान मंजूर करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यात यशवंतराव चव्हाण सैनिकी शाळा (सुपखेला, ता. जि. वाशिम), राजीव गांधी मिलिटरी स्कूल (कोलवड, ता.जि. बुलढाणा) आणि ईश्वर देशमुख सैनिकी शाळा (सावंगा बुद्रुक, ता. जि.यवतमाळ) या सैनिकी शाळांचा समावेश असून त्यांना प्रत्येकी सहा तुकड्या आणि प्रति तुकडी दोन प्रमाणे 36 शिक्षकपदे मंजूर करण्यात आली आहेत.
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये राज्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा, तसेच शालेय स्तरावर सैनिकी नेतृत्व गुणांचा विकास व्हावा यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात सैनिकी शाळा सुरू करण्याचा शासनाचा धोरणात्मक निर्णय आहे. तसेच आता या कायम विनाअनुदान यांतील कायम हा शब्द वगळण्यात आला असून मुल्यांकनाच्या निकषात बसलेल्या या शाळांच्या पाचवी ते दहावी असे प्रत्येकी सहा तुकड्यांना मान्यता देण्यात आली आहे. या शाळांना प्रत्येक तुकडीस दोन या प्रमाणे 36 शिक्षकांच्या पदासही मंजुरी देण्यात आली असून शासनाच्या नियमाप्रमाणे या शिक्षकांची नियुक्ती आणि पटसंख्या असणे बंधनकारक केले आहे. दरम्यान, राज्यातील शासन अनुदानित खासगी सैनिकी शाळांमध्ये सुधारणेसंदर्भात तपासणी करून शिफारसी करण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.