पिंपरी-चिंचवड : देशातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये राज्यातील 10 शहरे आहेत. या दहामध्ये पुणे आणि पिंपरी-चिंचवडचा समावेश आहे. या शहरांतील वायुप्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य सरकार कृती आराखडा तयार करत आहे. हा आराखडा येत्या सहा महिन्यांत तयार झालेला असेल. त्यानंतर वर्षभरात या आराखड्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ, नीरी आणि आयआयटी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने हा आराखडा तयार केला जात आहे. त्या त्या भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत या आराखड्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. केंद्र सरकारने देशभरातील प्रदूषित शहरांचे सर्वेक्षण केले. त्यामध्ये एकूण 95 शहरे सर्वाधिक प्रदूषित असल्याचे आढळून आले आहे.