मुंबई : केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अभ्यासातून राज्यातील नद्यांच्या सर्वेक्षणात 49 नद्या प्रदूषित असल्याचे आढळून आले आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी राष्ट्रीय नदी कृती योजना आणि राज्य नदी कृती योजना राबविण्यात येत आहे, अशी माहिती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
याबाबतचा प्रश्न सदस्य मल्लिकार्जुन रेड्डी यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना श्री. कदम बोलत होते.
श्री. कदम म्हणाले की, महानगरपालिका, नगरपालिका यांच्या प्रदूषणासाठी ठेवण्यात आलेल्या राखीव निधीतून प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाने उद्योगांना विनाप्रक्रिया सांडपाण्याचा विसर्ग करण्यास बंदी घातलेली असून उद्योगांतून निर्मित होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करुन प्रक्रियाकृत सांडपाणी बाहेर सोडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच महानगरपालिका, नगरपालिका यांना सांडपाणी व नागरी घनकचरा व्यवस्थापनाबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. नमामि चंद्रभागा प्राधिकरणाची स्थापना सुध्दा करण्यात आल्याचे श्री. कदम यांनी सांगितले. या चर्चेत सदस्य सर्वश्री प्रशांत बंब, डॉ. सुजित मिणचेकर आदींनी सहभाग घेतला.