राज्यातील पहिलाच पायलट प्रोजेक्ट : भुसावळात 3600 घरांना पहिल्या टप्प्यात मंजुरी ; माजी मंत्री एकनाथराव खडसे

भुसावळातील अतिक्रमणग्रस्तांना मिळणार आता हक्काचे घर : दुसर्‍या टप्प्यात चार हजार घरांना मंजुरी मिळणार : तर भुसावळात प्रोजेक्ट देशातील पहिलाच मोठा प्रोजेक्ट

भुसावळ : शहरातील रेल्वेच्या जागेवरील अतिक्रमण सुमारे दोन वर्षांपासून हटवण्यात आल्यानंतर तीन हजार सहाशे कुटुंब उघड्यावर आले होते मात्र या अतिक्रमणग्रस्तांना आता हक्काचे घर म्हाडाच्या योजनेंतर्गत मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात तीन हजार 600 घरांना मंजुरी मिळाली असून आगामी सहा महिन्यात पुन्हा चार हजार घरांना मंजुरी मिळेल, असा आशावाद माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी येथे व्यक्त केले. माजी नगरसेवक प्रा.सुनील नेवे यांच्या ‘अटल’ निवासस्थानी शनिवारी सायंकाळी झालेल्या पत्रकार परीषदेत त्यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, हा राज्यातील सर्वात मोठा प्रकल्प असून कदाचित देशातील पहिला प्रकल्प असू शकेल.

साडेपाच लाखात मिळणार घर
रेल्वेने अतिक्रमण हटवल्यानंतर अनेक लोकांवर संकट कोसळले होते, या लोकांना हक्काचे घरकुल मिळावे हा शब्द दिला होता व अजित पवारांच्या सभेत त्याबाबत आपण बोललो होतो. म्हाडा अंतर्गत सुरूवात तयार करण्यात आलेल्या घराची किंमत साडेतेरा लाख होती मात्र ही रक्कम न परवडणारी असल्याने पालिकेने रस्ते, पाणी, वीज सुविधा पुरवण्याची हमी घेतल्याने 355 स्वेअर फूट घराची किंमत आता साडेनऊ लाखांवर आली आहे. यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दखल घेतली. मुंबईत तीन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत दोन लाख रुपये कामगार महामंडळाकडून तर अडीच लाख रुपये प्रधानमंत्री आवास योजनेतून मिळवता येतील यावर चर्चा झाली. दिल्लीत खासदार रक्षा खडसे यांनी हा प्रस्ताव देवून त्याला मंजुरीही मिळवली. यामुळे आता गोरगरीरब पात्र लोकांना केवळ साडेपाच लाख रुपयांत घर मिळणार आहे शिवाय साडेपाच लाख रुपये लाभार्थींना हे घर तारण ठेवून हौसिंग फायनान्सकडून दीर्घ मुदतीसाठी घेता येतील. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याला मंजूरी मिळाल्याने राज्यातील सर्वांत मोठा गृहनिर्माण प्रकल्प भुसावळात साकारला जाईल कदाचित हा देशातील सर्वात मोठा प्रकल्प असेल, असा दावाही खडसेंनी केला.

तर पर्यायी जागांवर घरकुल उभारणार !
ते म्हणाले की, सर्वे क्रमांक 63 वर पार्कचे आरक्षण आहे. आरक्षण काढू नये ही सरकारची भूमिका असलीतरी मंत्री मंडळाची मंजुरी मिळाल्यास आरक्षण काढण्यात येईल किंवा मुख्याधिकार्‍यांनी दोन पर्यायी जागा सूचवल्या असून त्या पालिकेच्या असल्याने घरकुल उभारण्यास अडचण येणार नाही. जागा बदलचा प्रस्ताव देवून हा प्रकल्पाचे काम अवघ्या सहा महिन्यांत सुरु करण्यावर भर दिला जात असून दुसर्‍या टप्प्यातील चार हजार घरांच्या प्रकल्पालाही लवकरच मंजूरी मिळेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

आहे ‘त्या’ ठेकेदाराकडून काम करण्यावर भर
पालिकेने भुसावळातील 12 कोटी रुपये खर्चाच्या रस्त्यांचे काम करणार्‍या ठेकेदारास काळ्या यादीत टाकल्याने या संदर्भात खडसेंना छेडले असता ते म्हणाले की, पालिकेला स्वतः कामे करणे शक्य नाही मात्र आहे त्या ठेकेदाराकडून आता व्यवस्थीत करून घेणे हाच त्यावर पर्याय आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी व मुख्याधिकार्‍यांशी आपण दोन दिवसांपूर्वीच चर्चा केली आहे. पावसाळ्यापूर्वी ही कामे झाली पाहिजे अन्यथा येरे माझ्या मागल्यासारखी स्थिती होईल, असेही ते म्हणाले.

पालिका रुग्णालयात शवविच्छेदन होणार
अंतर्गत कुरघोड्यांमुळे पालिका रुग्णालयात शवविच्छेदन होत नसल्याने मृताच्या नातेवाईकांना होणारा मनस्ताव व शहरवासीयांसह पोलिस प्रशासनाची होत असलेली गैरसोय माजी मंत्री खडसेंच्या लक्षात आणून दिल्यानंतर माजी मंत्री खडसे यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.किरण पाटील यांच्याशी पत्रकार परीषदेतूनच संपर्क साधला. कुरघोड्या काहीही असोत त्यामुळे भुसावळकरांना त्रास होत असल्याने तातडीने शवविच्छेदन सुरू करा, अशा सूचना त्यांनी करताच येत्या दोन दिवसांत हा प्रश्न सोडवला जाईल, असेही डॉ.पाटील यांनी सांगितले.

पत्रकार परीषदेला यांची होती उपस्थिती
माजी नगरसेवक प्रा.सुनील नेवे, अ‍ॅड.बोधराज चौधरी, रीपाइं उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रमेश मकासरे, रीपाइं जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी, अनिकेत पाटील, प्रा. प्रशांत अहिरे, पुरूषोत्तम नारखेडे, शे. शफी शे अजीज , डीआरयुसीसीचे माजी सदस्य अनिकेत पाटील, सुमित बर्हाटे, पृथ्वीराज पाटील, लक्ष्मी मकासरे, सविता मकासरे, विजय सुरवाडे, विशाल नारखेडे, हिमांशू दुसाणे, दिनेश नेमाडे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.