मुंबई । भिवंडी बायपासवरील खारेगाव टोल नाक्यावर येत्या 13 मेपासून टोलवसुली बंद होणार आहे. त्यामुळे या रस्त्यावरुन प्रवास करणार्या वाहनधारकांचा टोल आता वाचणार आहे. शिवाय या टोलनाक्यामुळे होणार्या वाहतूक कोंडीतूनही मुक्तता होणार आहे. खारेगाव टोलनाका हा राज्यातील पहिला टोलनाका आहे. केंद्र सरकारने 4 जानेवारी 2002 मध्ये जारी केलेल्या अधिसूचनेमध्ये, 13 मे 2017 पर्यंच या रस्त्यावर टोलवसुलीची परवानगी असल्याचे स्पष्ट केले होते.
मुंबई-नाशिक महामार्गावर उभ्या असलेल्या या टोलनाक्यावर वसुलीचे कंत्राट आयडियल रोड बिल्डर्स अर्थात आयआरबी या कंपनीला देण्यात आले होते. या रस्त्याच्या देखभालीसाठी आयआरबीला 180.83 कोटींचा खर्च आल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे 1998 पासून या रस्त्याच्या देखभालीसाठी टोलवसुली सुरु झाली. कंपनीने आतापर्यंत 500 कोटींची वसुली केल्याचे सांगितले आहे. परंतु कंपनीने किमान दोन हजार कोटींची टोलवसुली केल्याची शक्यता माहिती अधिकार कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर यांनी व्यक्त केली आहे.