गरीब मुलांसाठी इन्प्लांट केंद्र नक्कीच ठरणार वरदान – नितीन गडकरी
नागपूर । कर्णबधीर असलेल्या मागास मुलांसाठी राज्यात प्रथमच कॉक्लियर इन्प्लांट केंद्र सुरू करण्यात आले आहे. शहरातील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात (मेयो) त्यासाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. त्यामुळे लहान मुलांना आता ऐकता व बोलता येणार आहे. मध्य भारतातील गरीब मुलांसाठी हे इन्प्लांट केंद्र नक्कीच वरदान ठरेल, असा विश्वास केंद्रीय भूपृष्ठ व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. ते कॉक्लियर इन्प्लांटच्या लोकार्पण कार्यक्रमात बोलत होते.
नागपूरात सुविधा उपलब्ध
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, यापूर्वी कॉक्लियर इन्प्लांट बसविणे हे खूप खर्चिक होते. तसेच ते बसवण्यासाठी पालकांना मुंबईला जावे लागत होते. मात्र आता नागपुरातच ही सुविधा निर्माण झाल्यामुळे मध्य भारतातील गोरगरीब मुलांसाठी सोयीचे झाले आहे. या केंद्राच्या उभारणीसाठी केंद्र सरकार तसेच राज्य सरकारच्या सहकार्यातून हे काम झाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. लोकार्पण सोहळ्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते एकूण 4 मुलांना कर्णबधीर यंत्राचे वाटप करण्यात आले. हे वाटप आराध्या नवलकर, नक्षत्र तलमले, मोहम्मद शाहीद आणि मोहम्मद आवाज या मुलांना करण्यात आले. त्यांच्यावर आज शस्त्रक्रिया केली जाणार आहे. उर्वरीत 6 जणांची टप्प्याटप्प्याने शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.