राज्यातील पॅसेंजर गाड्या कधी सुरु होणार?

0

डॉ.युवराज परदेशी: कोरोनामुळे सर्वसामान्य प्रवाशांसाठी बंद झालेली उपनगरी रेल्वेची अर्थात लोकलची दारे जवळपास दहा महिन्यांनी खुली झाली आहेत. प्रवासाच्या वेळेवरुन गोंधळ सुरु असला तरी किमान लोकल सेवा सुरु झाली, याचा जास्त आनंद आहे. आज नाही तर उद्या प्रवासाच्या वेळेत बदल होईलही. आता प्रतिक्षा आहे. देशांतर्गत सर्व रेल्वे सेवा नियमित सुरु होण्याची! कारण सध्यस्थितीत केवळ विशेष रेल्वे धावत आहेत. यात आरक्षित तिकीटांसह प्रवास करणे बंधनकारक आहे. दुसरीकडे सर्वसमान्यांच्या पॅसेंजर ट्रेन्स अद्यापही सुरु झालेल्या नाहीत. यामुळे सर्वसामान्यांना असंख्य अडचणींचा सामना करत मिळेल त्या वाहनाने प्रवास करावा लागत आहे. जसे मुंबई व उपनगरातील चाकरमन्यांचा विचार करुन लोकल सेवा सुरु करण्यात आली तसाच विचार उत्तर महाराष्ट्रातील चाकरमन्यांबाबत करायला हवा. नाशिक ते भुसावळ दरम्यान हजारो चाकरमाने पोटापाण्यासाठी दररोज प्रवास करतात. त्यांच्यासाठी नाशिक देवळाली – भुसावळ शटलसह अन्य पॅसेंजर गाड्या सुरु करण्याची आवश्यकता आहे. तसेच सध्या धावणार्‍या विशेष गाड्यांना पासधारकांसाठी स्वतंत्र बोगी जोडण्याचीही गरज आहे.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण देशात 24 मार्चपासून लॉकडाऊन लागू करण्यात आला. तेंव्हा रेल्वे गाड्यांची चाकेसुद्धा थांबली होती. जागतिक महायुद्ध, मुंबईतील बॉम्ब स्फोट, अतिरेकी हल्ला याने देखील रेल्वे सेवा बंद झाली नव्हती. मात्र आणीबाणी आणि काहीवेळ नैसर्गिक आपत्ती रेल्वे बंद काही काळ खंडीत झाली होती. मात्र कोरोना विषाणूमुळे रेल्वे सेवा दहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी बंद असल्याचे पहिल्यांदाच झाले. मात्र, अनलॉकमध्ये प्रवासी रेल्वेसेवा हळूहळू रूळावर येत आहे. जनजीवन पूर्वपदावर आणण्याबरोबरच प्रवासी वाहतूक सुरळीत करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारतर्फे रेल्वे सेवा सुरू करण्यास टप्प्या टप्प्याने परवानगी देण्यात येत आहे. आरोग्य कर्मचार्‍यांसह अत्यावश्यक सेवांमधील कर्मचार्‍यांसाठी लोकल सेवा पाच महिन्यांपूर्वीच सुरू झाली आहे. पण अन्य सेवांमधील चाकरमने, विक्रेते, पोट्यापाण्यासाठी छोटामोठा व्यवसाय करणारे व्यापारी, कष्टकरी, फेरीवाले आदींसाठी लोकलची दारे बंदच होती. लोकल सुरू करण्यासाठी सर्व बाजूंनी प्रचंड दबाव आल्यानंतरच राज्य सरकारला अखेर जाग आली. राज्यासह देशात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेस सुरुवात झाल्यानंतर आता मुंबई लोकल सेवेलाही हिरवा सिग्नल मिळाल्यानंतर 1 फेब्रवारीपासून लोकलसेवा सुरु झाली असली तरी, लोकलमधून प्रवास करण्यासाठी सर्वसमान्यांना वेळेचे बंधन टाकण्यात आले आहे.

सर्वसामान्यांना सकाळची पहिली लोकल ते सकाळी 7 वाजेपर्यंत तसेच दुपारी 12 पासून दुपारी 4 वाजेपर्यंत आणि रात्री 9 वाजल्यापासून शेवटच्या लोकलपर्यंत प्रवास करता येणार आहे. हे बंधन म्हणजे नोकरदारांची क्रूर थट्टाच म्हणावी लागेल. प्रशासनाने ठरवून दिलेल्या या वेळांमुळे चाकरमान्यांचे जीवन सुसह्य होण्याऐवजी अधिकच वेदनादायी होणार आहे. कारण कामावर जाण्यासाठी त्यांना फार लवकर उठावे लागेल. तसेच कामाची वेळ उशिरा असेल, तर कामाच्या ठिकाणी खूपच लवकर पोहोचल्याने त्यांचा वेळ मोठ्या प्रमाणात वाया जाऊ शकतो. तीच बाब कामावरून निघताना होणार आहे. कामावरून घरी येण्यास निघाल्यावर लोकल पकडण्यासाठी त्यांना रात्री नऊपर्यंत थांबावे लागेल. जाण्या-येण्याच्या या वेळांमध्ये सर्वसामान्यांबरोबरच अन्य प्रवाशांना मुभा असल्याने सर्वच मार्गांवरील लोकल गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होणार हे निश्चित. या विषयावरुन आता राजकारण सुरु झाले आहे. अर्थात ही काही नवी बाब नाही, लोकल सुरु करण्याच्या विषयाला राजकीय फोडणी आधीच मिळाली होती.

रेल्वे मंत्रालयाने आपण लोकल सेवा सुरू करण्यास तयार आहोत, असे राज्य सरकारला आधीच कळविले होते व राज्य सरकारकडून लोकल सेवा कशाप्रकारे सुरू केली जावी याबाबतच्या प्रस्तावाची हे प्रशासन वाट पाहत होते. लोकल गाड्यांना होणारी तुफान गर्दी व त्यामुळे कोरोनाचा वाढता धोका या सर्व बाबींचा साकल्याने विचार करून लोकल सेवा सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव लवकरात लवकर तयार करण्याची आणि कष्टकर्‍यांचा रोजी-रोटी कमावण्याचा मार्ग खुला करण्याची मोठी जबाबदारी सरकारची होती. यावरुन बरीच राजकीय चिखलफेक झाल्यानंतर अटी व शर्ती लागू करुन लोकल सुरु झाल्या आहेत. यानंतर राज्यात पॅसेंजर सेवा सुरु करण्याची मागणी जोर धरु लागली आहे. कारण अजूनही रेल्वेसेवा पूर्णपणे सुरु झालेली नाही मात्र राज्यांतर्गत काही गाड्यांसह लांब पल्ल्यांच्या काही प्रवासी गाड्या सुरु झाल्या आहेत.

प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेता रेल्वे बोर्डाने विशेष रेल्वे सुरु करण्यास परवानगी दिली आहे. भुसावळ विभागातून पुणे तसेच मुंबई जाणार्‍या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असला तरी या विभागातील चाकरमान्यांना अद्यापही दिलासा मिळालेला नाही. चाळीसगाव, पाचोरा, भुसावळ येथून जळगावला दररोज हजारो प्रवासी प्रवास करत असतात. या मार्गावर चाकरमन्यांची संख्यादेखील अधिक आहे. गत दहा महिन्यांपासून पॅसेंजर रेल्वे सेवेअभावी नोकरदारांचे हाल सुरू आहेत. आता सर्वच खासगी कार्यालये नियमित सुरु झाल्याने सर्व चाकरमन्यांची प्रचंड तारांबळ उडत आहे.

सर्वसामान्य प्रवाशांचेही मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. यामुळे रेल्वेने आतातरी प्रवाशांच्या सहनशिलतेचा अंत पाहू नये, अशी अपेक्षा आहे. या विभागांतर्गत नाशिक देवळाली शटलसह भुसावळ-मुंबई पॅसेंजर या दोन गाड्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. यामुळे या गाड्या त्वरीत सुरु होण्याची अपेक्षा आहे. या व्यतिरिक्त विभागातून धावणार्‍या विशेष रेल्वे गाड्यांना मासिक पासधारक चाकरमन्यांसाठी एखादी डबा राखीव ठेवल्यास चाकमन्यांचे हाल थांबू शकतात. याचा राज्य सरकार व रेल्वे प्रशासनाने सहानुभुतीपुर्वक विचार करण्याची आवश्यकता आहे. कोरोनानंतरचे जग वेगळे असेल, असे म्हटले जात होते त्याचा आता हळूहळू प्रत्यय येवू लागला आहे. अर्थात यास रेल्वे प्रवास देखील अपवाद नाही.