स्व. बाळासाहेब ठाकरे स्मृती ग्रामपंचायत कार्यालय व महिला सक्षमीकरण योजना राबविणार
मुंबई :- राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीला आता प्रशस्त ग्रामपंचायत कार्यालय मिळणार आहे. स्व. बाळासाहेब ठाकरे स्मृती ग्रामपंचायत कार्यालय व महिला सक्षमीकरण योजनेच्या अंतर्गत १००० पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना महाराष्ट्र शासनाकडून ग्रामपंचायत कार्यालयासाठी १२ लाख रुपये निधी देणार असल्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. यासाठी २५ कोटी रुपयांची तरतूद केली असल्याची माहिती मुंडे यांनी यावेळी दिली. यासोबतच ग्रामीण भागात महिलांच्या सक्षमीकरणासाठी देखील योजनेला मान्यता मिळाली असून त्यासाठीही ५ कोटीची तरतूद केली असल्याची माहिती मुंडे यांनी दिली. यावेळी राज्यमंत्री दादा भुसे हे देखील उपस्थित होते.
राज्यात एकूण २८ हजार ग्रामपंचायती असून ४,२४२ ग्रामपंचायतींना स्वताचे कार्यालय नसल्याचे भुसे यांनी यावेळी सांगितले. या ग्रामपंचायतींना या योजनेच्या अंतर्गत कार्यालय देणार असल्याचे ते यावेळी म्हणाले. १००० पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना महाराष्ट्र शासनाकडून १२ लाख रुपये निधी दिला जाणार आहे. ग्रामसचिवालयांसाठी याआधी केंद्राकडून अनुदान मिळायचे मात्र ते दोन वर्षांपासून अनुदान बंद झाले असल्याचे भुसे यांनी यावेळी सांगितले. यापैकी अनेक कामे ही पीपीपी मॉडेल अंतर्गत करण्यात येणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले. महिला सक्षमीकरण योजनेच्या अंतर्गत महिला बचत गटांना प्रोत्साहन तसेच ग्रामीण महिला उद्योजकांना सहकार्य केले जाणार असल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले.