राज्यातील बांगलादेशी, पाकिस्तानी नागरिकांची आकडेवारी द्यावी: प्रकाश आंबेडकर

0

मुंबई: देशात सुधारित नागरिकत्व कायदा लागू झाल्यानंतर देशात अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. आज महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडी कडून महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले आहे. ठिकठिकाणी वंचितच्या कार्यकर्त्यांकडून रास्ता रोको, निषेध केला जात आहे. तर काही ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. प्रकश आंबेडकर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलतांना राज ठाकरे यांच्यावर टीका केली. प्रकाश आंबेडकर यांनी राज ठाकरे भडकवण्याचे काम करत असल्याचे सांगितले. तसेच राज्यात बांग्लादेशी, पाकिस्तानी मुस्लीम किती याची आकडेवारी देण्याचे सांगितले.

राज्यात पुकारलेल्या वंचितच्या आंदोलनाला हिंसक वळण देण्यामागे भाजपा-आरएसएसचा डाव आहे. चेंबूर येथे काही कार्यकर्त्यांकडून बसची तोडफोड करण्यात आली. मात्र हे कार्यकर्ते वंचितचे नव्हते. काहीजण तोंडावर रुमाल बांधून आले होते त्यांनी ही दगडफेक केली. वंचितचे कार्यकर्ते चेहरे लपवून आंदोलन करत नाहीत. आंदोलन बदनाम करण्यासाठी अशाप्रकारचं षडयंत्र केलं जात आहे. पोलिसांनी या चेहरे लपवणाऱ्या लोकांचा शोध घ्यावा आणि त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

दरम्यान, देशाच्या व आणि महाराष्ट्राच्या विशिष्ट भागांत अन्य देशांतील मौलवींची ये-जा वाढली आहे. तिथे काय सुरू आहे, याची बाहेरच्यांना कल्पना नाही. मात्र त्यांंना काहीही कल्पना नसली तरी प्रत्यक्षात तिथे काहीतरी भयंकर शिजत असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. त्यामुळे मी स्वत: यासंदर्भात लक्ष घालून याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व राज्याच्या मुख्यमंत्र्यांना प्रत्यक्ष भेटून याची माहिती देणार असल्याचे राज ठाकरे यांनी भाषणात सांगितलं होतं.