नंदुरबार । राज्यातील भटके विमुक्त जाती-जमातींच्या प्रश्नांबाबत कॅबिनेटमंत्री राम शिंदे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक होऊन सकारात्मक निर्णय घेण्यात आले आहेत, अशी माहिती भटक्या विमुक्त हक्क परिषदचे राज्य कोषाध्यक्ष पुरुषोत्तम काळे यांनी दिली. यावेळी ना.प्रा.राम शिंदे, ना.मदन येरावर, ना.कर्मवीर इदाते यांचा हक्क परिषदेच्या वतीने बैठकीपूर्वी सत्कार करण्यात आला. मंत्रालयीन स्तरावर आयोजित शासकीय बैठकीत भटके विमुक्त हक्क परिषदेच्यावतीने दिलेल्या निवेदनावरील विषयांवर सविस्तर चर्चा घडवून येऊन धोरणात्मक निर्णय जाहीर करण्यात आले. राज्यातील भटके विमुक्तांच्या समस्यांबाबत शासन जागरुक असून सर्व प्रश्न सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करुन प्रत्येकाचे समाज जीवनमान कसे उंचवता येईल यासाठी शासन कटिबद्ध राहणार असल्याचे आश्वासन ना.प्रा.राम शिंदे यांनी बैठकीत हक्क परिषदेच्या शिष्टमंडळास दिले. भटके विमुक्त केंद्रीय आयोगाचे अध्यक्ष ना.दादा इदाते यांनी देखील राज्य शासनास लिखित स्वरूपात सूचना सादर केल्या. सादर केलेल्या सूचनांचा आदरपूर्वक विचार केला जाईल असेही प्रा.राम शिंदे यांनी सांगितले.
महत्वपुर्ण धोरणात्मक निर्णय घेणार
मंत्रालयात झालेल्या बैठकीची माहिती देतांना काळे म्हणाले की, भटके विमुक्त प्रवर्गातील जाती जमातींच्या प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी, समाजात जाणीव जागृती करुन समाज मुख्य प्रवाहात येण्यासाठी प्रशासन व संघटना या समन्वय साधून ते सोडविणेकामी भटके विमुक्त हक्क परिषद ह्या सामाजिक संघटनेच्यावतीने प्रशासनास प्रलंबित प्रश्नांबाबत चर्चा करण्याचे लेखी निवेदन देण्यात आले होते. त्याची दखल घेऊन व्हीजीएन/ओबीसी मंत्रालयाच्यावतीने मंत्रालयीन स्तरावर भटके विमुक्त हक्क परिषदेच्या राज्यस्तरीय शिष्टमंडळासोबत शासकीय बैठकीचे आयोजन आले होते. राज्याचे जलसंधारण, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागास वर्ग, विशेष मागास प्रवर्ग मंत्रालयाचे कॅबिनेट मंत्री ना.प्रा.राम शिंदे हे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. राज्यमंत्री मदन येरावर भारत सरकारच्या भटके विमुक्त केंद्रीय आयोगाचे अध्यक्ष ना.कर्मवीर दादा इदाते, विभागाचे सचिव गुप्ता, भटके विमुक्त हक्क परिषदेच्या राज्यस्तरीय शिष्टमंडळ यांच्या प्रमुख उपस्तितीत बैठक झाली.
बैठकीस यांची होती उपस्थिती
मंत्रालयात झालेल्या शासकीय बैठकीस प्रा.धनंजय ओंबासे, शंकर माटे, डॉ.प्रियंका राठोड, प्रा.सखाराम धुमाळ, प्रदेश उपाध्यक्ष मंगेशसिंग सोलंकी, पुरुषोत्तम काळे, बी.टी.मोरे, वसंत गुंजाळ, शंकर कोळेकर, साहेबराव गोसावी, सुपडू खेडकर, रामकृष्ण मोरे, सुनील धनगर, हिरामण गवळी, राजेंद्र जाधव, प्रतीक गोसावी, सुहास बुवा, भीमराव इंगोले, रवी पवार, हनुमंत शेगर, महादेव हणबर, तटकरे तेजस, राजेंद्र येमिटकर, सुरेश शिंदे, वाल्मिक घुगे, अनंत भालेकर, बळीराम नाईक, अशोक इंगोले, रवींद्र कोटकर आदी उपस्थित होते.