राज्यातील माळी समाजाचे नेतृत्व संपविण्याचा भाजपचा कट : कृष्णाजी यादव

0

इंदापूर । महाराष्ट्रातील माळी समाजाचे नेतृत्व संपविण्याचे कट कारस्थान भाजप सरकार व इतर काही जण करत आहेत. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना जामीन मंजूर केला जात नसून हा एकप्रकारे ओबीसी समाजावर अन्याय असल्यचे मत काँग्रेसचे कमिटी इंदापूर तालुकाध्यक्ष कृष्णाजी यादव यांनी व्यक्त केले.

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यावर होत असलेल्या अन्यायाविरोधात वाचा फोडून आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी निमगाव केतकी येथील संतसावतामाळी मंदीराच्या सभा मंडपात इंदापूर तालुक्यातील माळी समाजाच्या कार्यकर्ता बैठकीमध्ये ते बोलत होते. बावडा येथील शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष प्रकाश जगताप यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. माऊली बनकर, देवराज जाधव, वंसत मोहोळकर, दशरथ डोंगरे, दत्तात्रय शेंडे, मच्छिंद्रअप्पा चांदणे, तुषार जाधव, बाबजी भोंग, तात्यासाहेब वडापुरे, शशिकांत शेंडे, बापुराव शिंदे, अजित टिळेकर, संदीप भोंग आदी कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते.

23 जानेवारील तहसील कार्यालयावर मोर्चा
राज्यात आणि देशात अनेक मोठमोठ्या नेत्यांचे पाय भ्रष्टाचाराच्या चिखलात रुतले आहेत. अनेकांवर गुन्हे दाखल केले आहेत. त्याबाबत पुरावे आहेत पण त्यांना अटक करून जेलमध्ये टाकले जात नाही. इतर समाजाच्या नेत्यावर मात्र लगेच कारवाई करून जेलमध्ये टाकले जात आहे, असे निवृत्ती गायकवाड यांनी यावेळी बोलताना सांगितले. छगन भुजबळ हे ओबीसी समाजाचे नेते असल्यामुळेच त्यांना जामिन मिळू दिला जात नाही. यासाठी माळी समाजाने गावातील वाड्या-वस्त्यांवर जाऊन बैठका लावून समाज जागृती करावी व येणार्‍या 23 जानेवारीला इंदापूर तहसिल कार्यालयावर काढण्यात येणार्‍या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी ओबीसी समाजाचे प्रमुख कार्यकर्तेही उपस्थित होते.

अन्याया विरोधात आवाज उठविणार
भुजबळांना बळीचा बकरा करणार्‍यांना समाज कदापी माफ करणार नाही. या अन्यायाविरोधात आवाज उठविण्यासाठी संपुर्ण राज्यात तहसिल कार्यालयावर गेल्यावर्षी 2 जानेवारी 2016 रोजी मोर्चा काढण्यात आला होता. इथून पुढेदेखिल आंदोलने, मोर्चे काढण्यात येणार असून दुटप्पीपणाने वागणार्‍या सरकारला आगामी 2019 च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत माळी समाज जागा दाखवून देईल. भुजबळ यांच्यावर होत असलेल्या अन्यायाविरोधात आवाज उठविला जाईल, असे अ‍ॅड. यादव यांनी सांगितले.