मुंबई । राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येणार्या रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी येत्या डिसेंबरपर्यंत कालावधी देण्यात आला आहे. त्यामुळे सर्व अभियंत्यांनी तातडीने खड्डे बुजविण्याची कार्यवाही सुरू करावी, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिले. रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याच्या कामाची सद्य:स्थिती जाणून घेऊन मंत्री श्री. पाटील यांनी हे खड्डे बुजविण्यासाठी टेंडर देण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करून 25 सप्टेंबरपर्यंत हे काम पूर्ण करावे, अशा सूचना दिल्या. खड्डे भरण्यासाठीच्या निविदांना जर योग्य प्रतिसाद मिळाला नाही तर सार्वजनिक बांधकाम विभाग स्वतः हे खड्डे बुजविणार आहे. त्यासाठी लागणारे आवश्यक साहित्य/सामग्री खरेदी करण्यात येईल. परंतु कोणत्याही परिस्थितीत डिसेंबर अखेरपर्यंत राज्यातील सर्व खड्डे भरून काढण्याचे निर्देश दिले.