राज्यातील लाखो शेतकरी निघाले संपावर

0

मुंबई । अर्थसंकल्पीय अधिवेशनापासून शेतकर्‍यांच्या कर्जमाफीचा तापलेला मुद्दा अजूनही शांत होताना दिसत नाही. उलट दिवसेंदिवस तो अधिकच तापू लागला आहे. परिणामी शेतकर्‍यांसमोरील अडचणीत वाढ होत आहे. कर्जबाजारीपणाला आणि दुष्काळाला कंटाळून शेतकरी आत्महत्या करत आहेत. म्हणूनच कर्जमाफीसाठी शेतकर्‍यांनी आता आणखी आक्रमक पवित्रा घेतला आहे. यासाठी राज्यातील लाखो शेतकर्‍यांनी संपाचे हत्यार उपसले आहे. कर्ज काढून शेती करण्यापेक्षा येत्या 1 जूनपासून संपावर जाण्याचा निर्णय 150 गावांमधील शेतकर्‍यांनी घेतला आहे. शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने व सरकारची सर्व धोरणे शेतकरी विरोधी असल्याचा आरोप शेतकर्‍यांकडून केला जात आहे. या संपाला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही पाठिंबा दिला आहे.

दोन वर्षापासून शेतकर्‍यांच्या आत्महत्येत वाढ
जिल्ह्यात गेल्या दोन वर्षापासून शेतकर्‍यांच्या आत्महत्येच्या घटनेत कमालीची वाढ झाली आहे. शेतमालाला मिळणारा हमीभाव, नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान आणि सरकारचे शेतीविरोधी धोरण यामुळे शेती व्यवसाय ठप्प पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे शेतकर्‍यांवर उपासमारी आणि आत्महत्येची वेळ आल्याचा आरोप शेतकर्‍यांनी केला आहे. कांदा, द्राक्षे, डाळींब, केळी या पिकांसोबतच भाजीपाल्यालादेखील भाव मिळेनासा झाला आहे. या संकटांवर कायमचा तोडगा काढण्यासाठी आता 1 जूनला होणार्‍या संपत 150 गावे सहभागी होणार आहेत. या संपात शेतकर्‍यांची संख्या 1 लाखाहून अधिक असणार आहे. कर्ज काढून पिकवलेल्या शेतीत नुकसानच सहन करावे लागत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी अल्प भांडवलात कुटुंबाच्या गरजेपुरतेच धान्य पिकवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी शेतकर्‍यांनी गावोगावी बैठका घेण्यासही सुरुवात केली आहे. शेतमालाला योग्य भाव द्या अन्यथा शेतमाल विकणार नाही आणि पिकवणारही नाही, अशी भूमिका घेत शेतकर्‍यांनी संपाचा इशारा दिला आहे. नाशिक जिल्ह्यात चांदवड, दिंडोरी, निफाड, इगतपुरी, सिन्नर, कळवण, सटाणा, येवला आदी तालुक्यांमधून शेतकर्‍यांनी विशेष ग्रामसभा घेऊन शेतकर्‍यांनी संप करण्याचे ठरवले आहे.

या तर मागील सरकारच्या चुका
राज्याचे सिंचनक्षेत्र जोपर्यंत पन्नास टक्क्यांपर्यंत जात नाही तोपर्यंत शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबणे अशक्य आहे. मागच्या सरकारने केलेल्या चुकांमुळेच शेतकर्‍याची वाईट अवस्था झाली आहे. राज्यातील सिंचन क्षेत्रासाठी केंद्र सरकारने 36 हजार कोटी मंजूर केले आहेत.
– नितीन गडकरी, केंद्रीय वाहतूक, दळणवळण मंत्री

कर्जमाफीसाठी आरपारची लढाई
कर्जमाफीचा विषय गंभीर असल्याने शिवसेना शेतकर्‍यांच्या सोबत राहील. कर्जमाफी नव्हे तर, कर्जमुक्तीसाठी लढणार आहे. शेतकर्‍यांच्या आत्महत्या होत असल्याचे वारंवार दिसून येत आहे. आता शेतकर्‍यांवर कर्जापायी ही वेळ येऊ नये, यासाठीच आता आरपारची लढाई करू.
– उध्दव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख

अण्णा हजारे सक्रीय सहभाग घेणार…
संपूर्ण कर्जमाफी आणि इतर मागण्यांसाठी 1 जूनपासून राज्यातील शेतकरी संपावर जाणार आहेत. राज्यव्यापी आंदोलन अहिंसा मार्गाने होणार असून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे या संपात सक्रिय सहभाग घेणार असल्याची माहिती मिळाली आहे. राज्य समन्वय समिती स्थापन करण्याची तयारी सुरू झाली असून राळेगणसिद्धी येथे अण्णा हजारे यांच्या उपस्थितीत लवकरच या संदर्भात बैठक होणार आहे.