मुंबई । राज्यातील लोकसभेच्या दोन जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली असून, ही निवडणूक भाजपची आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कसोटी पाहणारी ठरणार आहे तसेच 2019 च्या राज्यातील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीची ही पोटनिवडणूक लिटमस टेस्ट ठरणार आहे. भाजपवर टीका करत नाना पटोले यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्याने भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली होती, तर खासदार चिंतामण वानगा यांच्या निधानाने पालघरची जागा रिक्त झाली होती. या दोन्ही जागांवर पोटनिवडणूक जाहीर झाली असून, 28 मे रोजी मतदान आणि 31 मे रोजी मतमोजणी होत आहे.
याशिवाय पतंगराव कदम यांच्या निधनामळे रिक्त झालेल्या पलुस-कडेगाव विधानसभेसाठीही पोटनिवडणूक होत आहे. 2014 साली झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत भंडारा-गोंदियाची जागा भाजपने 1 लाख 49 हजार मतांनी जिंकली होती, तर पालघरची जागा 2 लाख 40 हजार मतांनी जिंकली होती. मात्र, मागील चार वर्षांत राज्यातील चित्र बदलले आहे. त्यामुळे या दोन्ही जागा राखणे हे भाजपसाठी आव्हानात्मक असणार आहे.
भाजपला पोटनिवडणुकीत यश नाही
यापूर्वी राजस्थानमधील दोन आणि उत्तर प्रदेशातील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भाजपला आपल्या जागा राखता आल्या नाहीत. त्यामुळेच भाजपसाठी आणि मुख्यमंत्र्यांसाठी लोकसभेच्या दोन जागांची पोटनिवडणूक परीक्षा पाहणारी ठरणार आहे. राज्यातील बदललेले राजकीय परिस्थिती, शेतकर्यांमधील अस्वस्थता, शिवसेना साथ देणार नसल्याची शक्यता, तर विरोधक काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची एकी हे मुद्दा भाजपसाठी अडचणीचे ठरणार आहेत. 2019 च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीपूर्वी ही पोटनिवडणूक होत असल्याने ती भाजपसाठी लिटमस टेस्ट ठरणार आहे.