राज्यातील शेतकर्‍यांना दसर्‍याआधी कर्जमुक्त करा

0

मुंबई । शेतकर्‍यांच्या कर्जमाफीची घोषणा झाल्यानंतरही प्रत्यक्षात कर्जमाफी न झाल्याने शेकडो शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. या आत्महत्या थांबाव्यात यासाठी शेतकर्‍यांना दसर्‍याआधी कर्जमुक्त करा अशी आग्रही मागणी शिवसेनेच्या मंत्र्यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असता शेतकर्‍यांवरील सर्व गुन्हे मागे घेण्यात येतील 15 दिवसांत पूर्ण करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी परिवहन मंत्री दिवाकर रावते, राज्यमंत्री दादा भुसे उपस्थित होते.

शिवसेना शेतकर्‍यांच्या पाठीशी
कर्जमाफीच्या घोषणेनंतर खरीप हंगाम लोटला तरी अद्याप शेतकर्‍यांची कर्जमाफी झाली नाही. त्यामुळे शेतकर्‍यांना निदान दसर्‍याआधी कर्जमाफी झाली तर त्यांना खरीप हंगामासाठी नवीन कर्ज काढणे शक्य होईल, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सांगितले. यावेळी पर्यावरणमंत्री रामदास कदम म्हणाले की, कर्जमाफीसाठी शेतकर्‍यांच्या आंदोलनात शिवसेना शेतकर्‍यांच्या खांद्याला खांदा लावून उतरली. आंदोलनादरम्यान शेतकर्‍यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली. शेतकर्‍यांवरील सर्व गुन्हे मागे घेण्यात येतील असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे रामदास कदम यांनी सांगितले.

मंत्री आणि आमदारांची उपस्थिती
मुख्यमंत्र्यांना निवेदन देताना शिष्टमंडळात शिवसेना नेते उद्योगंमत्री सुभाष देसाई, परिवहन मंत्री दिवाकर रावते, पर्यावरणमंत्री रामदास कदम, आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर, गृह राज्यमंत्री दीपक केसरकर, राज्यमंत्री संजय राठोड, दादा भुसे, आमदार सुनील शिंदे, सदा सरवणकर, अजय चौधरी उपस्थित होते.