राज्यातील संघटनांच्या भूमिकेवर पुढील दिशा ठरणार
मराठा समाजाच्या बैठकीत निर्णय ; मंगळवारी पुन्हा बैठक
जळगाव – सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यातील मराठा समाजामध्ये मोठी नाराजी पसरली आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने आरक्षणाचा चेंडू केंद्राच्या कोर्टात टोलविला आहे. दरम्यान राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मराठा समाज बैठका घेऊन पुढील दिशा ठरविण्याबाबत चर्चा विनीमय करीत आहे. जळगाव शहरातही मराठा समाजातील नेत्यांची आज जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळ येथे बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील संघटनांच्या भूमिकेनंतर पुढील दिशा ठरविण्याचा निर्णय बैठकीत झाल्याची माहिती माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी दिली.
मराठा समाज आरक्षण रद्द झाल्यानंतर राज्यात काही ठिकाणी मराठा समाजातर्फे आंदोलने करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयसंदर्भात काल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट करीत आरक्षणाचा चेंडू केंद्राकडे टोलविला आहे. असे असले तरी राज्यातील मराठा समाजाकडुन पुढील लढा उभारण्याबाबत चाचपणी केली जात आहे. आज जळगाव शहरातील मराठा नेत्यांची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी मार्गदर्शन केले. न्यायालयीन लढाईसंदर्भातही बैठकीत चाचपणी करण्यात आली. दरम्यान मराठा समाजाने संयम राखुन ही लढाई लढायची असल्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती गुलाबराव देवकर यांनी दिली.
मंगळवारी जिल्ह्यातील सर्वपक्षिय लोकप्रतिनिधींची बैठक
येत्या मंगळवारी जिल्ह्यातील सर्वपक्षिय मराठा समाजातील नेत्यांची बैठक दुपारी ४ वा. नुतन मराठा महाविद्यालय येथे आयोजीत करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा बँकेचे संचालक संजय पवार यांनी दिली. या बैठकीत समाजातील नेत्यांशी चर्चा करून पुढील निर्णय होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यांची होती उपस्थिती
या बैठकीला माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, जिल्हा बँकेचे संचालक संजय पवार, विनोद देशमुख, रवी देशमुख, हेमंतकुमार साळुंखे, दीपक सुर्यवंशी, अॅड. विजय पाटील, नंदू पाटील, अॅड. सचिन पाटील, सुशील शिंदे, हरिष पाटील, राहुल पाटील, केतन पाटील, मिलींद सोनवणे, योगेश पाटील, प्रमोद पाटील, अॅड. सत्यजित पाटील, शैलेंद्र पाटील, सुनील गरूड, रवींद्र पवार, पराग घोरपडे, पराग पाटील, नवल पाटील, भगवान शिंदे, योगेश पाटील आदी उपस्थित होते.