जळगाव : केंद्राचे अध्यक्ष निवडण्यासाठी देशातील निम्मे राज्यांचे अध्यक्ष निवडले जाणे आवश्यक असते. त्यात महाराष्ट्राच्या अध्यक्षाची निवड झाल्याशिवाय केंद्राच्या अध्यक्षाची निवड करणे योग्य होणार नाही. त्यामुळे राज्यातील संघटनात्मक निवड प्रक्रिया दि. 30 डिसेंबर पर्यंत पुर्ण करण्यात येणार असल्याची माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी आज पत्रकारांशी बोलतांना दिली.
शहरालगत असलेल्या औद्योगिक वसाहत परिसरातील बालाणी लॉन्स येथे भाजपाची अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगाव अशा पाच जिल्ह्यांची विभागाची बैठक आज पार पडली. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील, प्रदेश संघटनमंत्री विजय पुराणिक, विभागीय संघटनमंत्री किशोर काळकर, माजी मंत्री एकनाथराव खडसे, माजी मंत्री आ. गिरीश महाजन, आ. जयकुमार रावळ, खा. रक्षा खडसे, खा. उन्मेष पाटील आदी उपस्थित होते.
बैठकीला यांची होती उपस्थिती
उत्तर महाराष्ट्रस्तरीय बैठकीला माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आ. गिरीश महाजन, एकनाथराव खडसे, आ. राजूमामा भोळे, महापौर सीमा भोळे, आ. जयकुमार रावळ, आ. डॉ. विजयकुमार गावित, भरत गावित, खा. डॉ. हिना गावित, नंदुरबारचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, अहमदनगरचे दिलीप गांधी, शिवाजी कर्डीले, देवयानी फरांदे, आमदार सिमा हिरे, आमदार हरीभाऊ जावळे, आमदार संजय सावकारे, मनोज बियाणी, डॉ. गुरूमुख जगवाणी, भगत बालाणी, कैलास सोनवणे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.
दुपारी 12 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत ही बैठक चालली. बैठकीनंतर पत्रकारांना माहिती देतांना प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, दर तीन वर्षानंतर संघटनात्मक निवडणुका होतात. यावेळी हरीयाणा आणि महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांमुळे संघटनात्मक निवडणुका होऊ शकल्या नाही. केंद्राचं गणित हे संघटनात्मक निवडणुकांशी जुळलेले आहे. त्यामुळे कोकण, ठाणे, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा असा विभागनिहाय दौरा केला जात आहे. विभागीय स्तरावर संघटनात्मक निवडणुकांसाठी होत असलेल्या या बैठकांमध्ये प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेतला जात आहे. दि. 20 डिसेंबर पर्यंत मंडल अध्यक्ष, दि. 30 डिसेंबरपर्यंत जिल्हाध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्ष निवडीची प्रक्रिया पुर्ण केली जाणार आहे. संघटनात्मक निवडणुकांव्यतीरिक्त इतर कुठल्याही विषयावर चर्चा झाली नसल्याचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
खडसेंच्या उपस्थितीबाबत उत्सुकता
माजी मंत्री एकनाथराव खडसे हे पक्षावर नाराज आहेत. त्यामुळे विभागीय बैठकीला ते उपस्थित राहतील की नाही अशी शंका उपस्थित केली जात होती. सकाळी 11 वाजेपासूनच या विषयाची अनेकांना उत्सुकता लागून होती. अखेर दुपारी 3.30 वा. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे आगमन झाले आणि चर्चांना पुर्णविराम मिळाला. बालाणी लॉन्स परिसरात पोलीसांचा देखिल मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता.