मुंबईः राज्यात अवेळी पाऊस, अवर्षण, शेतीमालाला भाव नसणे आदी संकटाना सामोरे जात सहकारी बँकांकडील २२ हजार कोटी रूपयांचे घेतलेल्या कर्जपैकी जवळपास १३ हजार कोटी रूपयांचे कर्ज शेतकऱ्यांनी फेडले आहे. राज्यातील सहकारी बँकाकडील शेतकऱ्यांची थकीत कर्जे ही फक्त ८ हजार कोटी रूपयांची असल्याची माहिती सहकार खात्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
राज्यात ३० जिल्हा सहकारी बँका आहेत. यापैकी यवतमाळ, नाशिक, सोलापूर, जळगांव, पुणे, अहमदनगर जिल्हा बँकांनी सर्वाधिक कर्जाचे वाटप केले आहे. तर यवतमाळ, सोलापूर, जळगांव जिल्हा बँकांनी दिलेल्या कर्जपैकी फक्त जवळपास ५० टक्के कर्जाची वसुली झाली असून उर्वरीत बँकांनी जरी कमी कर्ज दिलेले असले तरी जवळपास ३० ते ४० टक्के रक्कम शेतकऱ्यांकडेच थकीत असल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील ३० जिल्हा बँकाकडून मागील अनेक वर्षात शेतकऱ्यांना २२ हजार ८०८.५९ कोटी रूपयांची पीक कर्जे दिली. या दिलेल्या कर्जापैकी २२ हजार ५३८ कोटी रूपयांची वसुली होणे बाकी होते. या थकित रकमेपैकी १३ हजार ६९९.३७ कोटी रूपयांच्या कर्जाची वसूली जिल्हा बँकाकडून करण्यात आली आहे. तर ८ हजार ८३९ कोटी रूपयांची थकबाकी अद्याप शेतकऱ्यांकडे असल्याचेही ते पुढे बोलताना म्हणाले.
शेतकऱ्यांना कर्जमाफी देताना राज्य सरकारवरील बोजा कमी होणार आहे. तसेच गरजू शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड होत त्यांच्या एकूण शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्ज रकमेपैकी जवळपास फक्त ३० टक्के रक्कमच राज्य सरकारला भरावी लागणार आहे. या जिल्हा बँका व्यतीरिक्त राष्ट्रीयकृत आणि खाजगी बँकांकडून देण्यात आलेल्या कर्जाचा भारही राज्य सरकारवर राहणार आहे. त्यामुळे राष्ट्रीयकृत आणि खाजगी बँकांकडून वितरीत करण्यात आलेल्या कर्जाच्या आकड्याची जमावाजमव करण्याचे काम सध्या सुरु असल्याचेही त्यांनी शेवटी सांगितले.