राज्यातील साडेसात हजारांपेक्षा अधिक आंगणवाड्या झाडाखाली!

0

कायमस्वरुपी इमारतीसाठी लोकलेखा समितीने केल्या सुचना

मुंबई:- राज्यातील सात हजार ६५८ अंगणवाड्यांना कायमस्वरुपी जागा नसून त्या चक्क झाडाखाली भरत असल्याची गंभीर बाब लोकलेखा समितीच्या अहवालातून समोर आली असून कायमस्वरूपी इमारतींसाठीची तजवीज करण्याबाबत काही सुचना या समितीने सरकारला केल्या आहेत. महिला व बालकल्याण विभागाच्या लेखापरिक्षणादरम्यान उघड झालेल्या उणिवा आणि त्रुटींची पडताळणी करून शिफारसी करणारा २०१७-१८ या आर्थिक वर्षाचा लोकलेखा समितीचा अहवाल मंगळवारी विधानसभेत मांडण्यात आला.

राज्यातील ग्रामीण भागात बहुतांश अंगणवाड्यांना कायमस्वरुपी जागा नसल्याची बाब समोर आली आहे. अशा वेळी गावातील एखादे मंदिर, खाजगी जागा किंवा एखाद्या झाडाखाली अंगणवाडी भरवावी लागते. राज्यातील सात हजार ६५८ अंगणवाड्या खुल्या जागेत भरवल्या जात असल्याची बाब महालेखापालांच्या अहवालात दिसून आली आहे. त्या अनुषंगाने लोकलेखा समितीने संबंधित विभागाकडे विचारणा केली असता, राज्यात एकही अंगणवाडी झाडाखाली भरत नसून काही अंगणवाड्या खुल्या जागेत भरत असल्याचा अहवाल विभागाकडून प्राप्त झाला नसल्याचे उत्तर महिला बाल कल्याण सचिवांनी दिल्याचा उल्लेख लोकलेखा समिती अहवालात करण्यात आला आहे.

या अंगणवाड्यांच्या बांधकामासाठी काय नियोजन करण्यात आले आहे, अशी विचारणा लोकलेखा समितीने केली असता महिला आणि बाल कल्याण विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार राज्यात एकूण १ लाख आठ हजार अंगणवाड्या असून त्यापैकी ६८ हजार अंगणवाड्या विभागाच्या मालकीच्या किंवा दान म्हणून मिळालेल्या इमारतीत आहेत, २७ हजार अंगणवाड्या भाड्याच्या इमारतीत आहेत. तर दर तीन ते चार महिन्यांनी जागा बदलाव्या लागत असलेल्या अंगणवाड्यांची संख्या ४ हजार ३०० इतकी आहे. त्यावर एकूण १ लाख ८ हजार अंगणवाड्यांची संख्या आणि तीन प्रकारच्या अंगणवाड्यांची एकत्रित बेरीज जुळत नसल्याची बाब लोकलेखा समितीने महिला बाल कल्याण विकास विभागाच्या सचिवांच्या निदर्शनास आणत कायमस्वरूपी इमारतीची तजवीज करण्याबाबत काही शिफारसी केल्या आहेत.