राज्यातील सात सिंचन प्रकल्पांना सुधारीत मान्यता

0

जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन यांच्या प्रयत्नामुळे 84 हजार 315 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार

मुंबई । राज्यातील सात सिंचन प्रकल्पांना जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्या पाठपुराव्यामुळे सुधारीत प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील तळवाडे भामेर लघुपाटबंधारे तलाव, हरणबारी मध्यम प्रकल्पातील डाव्या कालव्याची लांबी वाढविणे, धुळे जिल्ह्यातील सुलवाडे जामफळ कनोली उपसासिंचन, सातारा जिल्ह्यातील वांग मध्यम प्रकल्प, जिहे कटापूर उपसिंचन प्रकल्प, सोलापूर जिल्ह्यातील सिनामाढा उपसा सिंचन योजना, शिंगोली येथील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा यांचा सामावेश आहे. या मान्यतेमुळे राज्यातील 84 हजार 315 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. आज वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षेतेखाली झालेल्या बैठकीत ही मान्यता देण्यात आली.

उत्तर महाराष्ट्रातील तीन प्रकल्पांचा समावेश
नाशिक जिल्ह्यातील हरणबारी धरणाचे पुराचे पाणी तळवडे भामेर लघुपाटबंधारे तलावात सोडल्यामुळे- बागलाण या अवर्षण प्रवण तालुक्यातील एकूण 16 गावातील 495 हेक्टर तर हरणबारी मध्यम प्रकल्पातील डाव्या कालव्याची लांबी वाढविणे- बागलाण या अवर्षण प्रवण तालुक्यातील एकूण 10 गावातील 246 हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा व पिण्याचा पाण्याचा प्रश्‍न सुटणार आहे. धुळे जिल्ह्यातील सुलवाडे जामफळ कनोली उपसासिंचन योजनामुळे धुळे जिल्ह्याच्या अवर्षण प्रवण भागातील शिंदखेडा तालुक्यातील 48 गावातील 26 हजार 907 हेक्टर, व धुळे तालुक्यातील 23 गावातील 6 हजार 460 हेक्टर असे एकूण 33 हजार 367 हेक्टर क्षेत्र सिंचीत होणार आहे.

सातारा जिल्ह्यातील वांग मध्यम प्रकल्पामुळे सातारा जिल्ह्यातील पाटण व कराड तालुक्यातील 6,200 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. जिहे कटापूर उपसिंचन प्रकल्पामुळे सातारा जिल्ह्यातील अवर्षण प्रवण भागातील खटाव तालुक्यातील 11 हजार 700 हेक्टर, व माण तालुक्यातील 15 हजार 800 हेक्टर असे एकूण 27 हजार 500 हेक्टर क्षेत्र सिंचनाचा लाभ होणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील सिनामाढा उपसा सिंचन योजनामुळे माढा तालुक्यातील अवर्षण प्रवण क्षेत्रातील 40 गावातील 16 हजार 150 हेक्टर क्षेत्राला प्रवाही पद्धतीने सिंचनाचा लाभ होणार आहे. शिंगोली येथील कोल्हापूर पद्धतीचा बंधाराच्या योजनेमुळे – 357 हेक्टर इतक्या जमिनीस सिंचनाचा लाभ मिळणार आहे.