शिवसेनेच्या १४ आमदारांची आंदोलनाद्वारे शासनाकडे मागणी
नागपूर – स्वतःला निधर्मी म्हणवणार्या शासनाने केवळ अन् केवळ हिंदूंच्याच मंदिरांचे सरकारीकरण केले आहे; मात्र एकाही मशीद आणि चर्चचे सरकारीकरण करण्याची हिंमत सरकारमध्ये नाही. मंदिरांचे सरकारीकरण झाल्यावरही तेथील भ्रष्टाचार कमी न होता तो आणखीनच वाढला आहे. केवळ हिंदूंच्याच मंदिरांचे सरकारीकरण करण्याची शासनाची कृती संविधानातील समानेच्या तत्त्वाच्या विरोधात आहे. हिंदूंमध्ये जातीय तेढ निर्माण करणारी आहे. त्यामुळे हिंदूंच्या मंदिरांचे सरकारीकरण रद्द झाले नाही, तर सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि मंदिर ट्रस्ट यांच्या वतीने शिवसेना राज्यव्यापी आंदोलन पुकारेल, असा इशारा शिवसेनेच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्यांवर आंदोलन करतांना सरकारला दिला.
हे देखील वाचा
आंदोलनाचे नेतृत्त्व शिवसेनेचे महाड (जि. रायगड) येथील आमदार श्री. भरतशेठ गोगावले यांनी केले. या वेळी शिवसेनेचे आमदार राजन साळवी, सदानंद चव्हाण, अशोक पाटील, प्रकाश फातर्पेकर, बालाजी किणीकर, अमित घोडा, शांताराम मोरे, राजाभाऊ वाजे, प्रकाश सुर्वे, जयप्रकाश मुंदडा, वैभव नाईक, प्रकाश आबीटकर, राजेश क्षीरसागर उपस्थित होते. या वेळी ‘मशीद आणि चर्च यांना वगळून केवळ हिंदूंच्याच मंदिरांचे सरकारीकरण करणार्या शासनाचा निषेध असो’, ‘मंदिरात भ्रष्टाचार करणार्यांवर कारवाई करा‘, ‘शनि मंदिराचे सरकारीकरण रद्द झालेच पाहिजे’,अशा जोरदार घोषणा या वेळी देण्यात आल्या.
या वेळी आमदार भरतशेठ गोगावले म्हणाले की, पंढरपूरचे श्री विठ्ठल मंदिर, शिर्डीचे साईबाबा मंदिर, कोल्हापूरचे श्री महालक्ष्मी मंदिर, तुळजापूरचे श्री तुळजाभवानी मंदिर येथे शासकीय समित्यांनी केलेल्या भ्रष्टाचार विधीमंडळात उघड करूनही अनेक वर्षे त्यावर कारवाई केली जात नाही. उलट दोषींना पाठिशी घातले जात आहे.